मुंबई : तुमचे आधार कार्ड पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यातील माहिती चोरणे अशक्य असल्याचा केंद्र सरकारने दावा केला होता. मात्र, हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून ५०० रुपयांत देशातल्या कोट्यवधी लोकांच्या आधार कार्डची माहिती अगदी सहज उपलब्ध होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘द ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून व्हॉटस अप या मेसेजिंग अॅपवर हा ग्रुप कार्यरत असून अनेकांनी याद्वारे आधार कार्डधारकरांची माहिती चोरल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी युआयडीएआयचे रिजनल अॅडिशनल डायरेक्टर जनरल संजय जिंदल यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. हा सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठा धोका असून लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे जिंदल म्हणाले.
काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल झाला होता. या मेसेजच्या माध्यामातून ५०० रुपयांत १०० कोटी आधार कार्डचा अॅक्सेस आपल्याला मिळाला असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. या प्रकरणाच्या अधिक खोलावर तपास केल्यानंतर यात मोठे रॅकेट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक एजंट यात गुंतले असल्याची भीतीही त्यांनी व्यक्ती केली आहे. ५०० रुपये दिल्यानंतर आधार कार्डच्या अॅक्सेसचा गेटवे आणि लॉग इन पासवर्ड १० मिनिटांसाठी दिला जातो. त्याद्वारे आधार कार्डचा नंबर टाकल्यावर कोणत्याही व्यक्तिची माहिती मिळू शकते, असा धक्कादायक खुलासा या वृत्तपत्राने केला आहे. तसेच अतिरिक्त ३०० रुपये दिल्यास उपलब्ध माहितीची प्रिंट काढण्याचा अॅक्सेसही मिळतो, अशी आणखी एक धक्कादायक बाब त्यांनी उजेडात आणली आहे.