मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) – ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एक मेळावा कालिदास नाट्यगृह मुलुंड पश्चिम या ठिकाणी होणार आहे. ९ मार्चला होणा-या या शिबिराचे निमंत्रण देण्यासाठी ईशान्य मुंबई शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील हे आज मातोश्री येथे गेले होते. गेल्या काही दिवसात इतर पक्षात जाण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या त्या सर्व अफवा असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी यावेळी पत्रकारांना स्पष्ट केले.
९ मार्चला होणा-या मेळाव्यासाठी खासदार संजय दिना पाटील यांच्या सोबत विभाग प्रमुख रमेश कोरगावकर, सुरेश पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मातोश्री येथे जाऊन खा. संजय पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मेळाव्याचे निमंत्रण दिले.
दरम्यान, मातोश्री बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना खासदार संजय दिना पाटील म्हणाले मी शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही. गेल्या काही दिवसात मी सत्ताधा-यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ते केवळ माणुसकीच्या नात्याने, सर्वांच्या सुख दुखात जाणे गरजेचे आहे. तेच मी केले. त्यामुळे माध्यमात बातम्या आल्या की मी पक्ष सोडून जाणार आहे. मात्र त्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.