
मुंबई/वांगणी : विद्या विकास एज्युकेशन संचलित वांगणीतील विद्या विकास माध्यमिक शाळेने एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविला. येथील विद्यार्थ्यांनी सैनिक बंधूंकरिता राख्या व शुभेच्छा पत्रे पाठविली. आपल्या सीमेवरील सैनिकांचे मनोधैर्य वाढावे, यासाठी शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
एक राखी सैनिकांसाठी या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिक बंधूंकरिता राख्या व शुभेच्छा पत्रे तयार केली. शिक्षकांनी सणाचे महत्त्व सांगताना आपल्या सीमेवरील जवानांचे त्याग, शौर्य आणि संरक्षणाची भूमिका अधोरेखित केली. सैनिकांविषयी आदर व बंधुभाव जपण्यासाठी या उपक्रमात विद्यार्थिनी सहभागी झाल्या. राखी संदेश देताना काही विद्यार्थिनींनी आपल्या भावना सुंदर कवितेत, भावनिक शब्दात मांडल्या. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी त्यांनी असे लिहिले होते की,
तुम्ही तिथे सीमेचे रक्षण करतात म्हणून आम्ही सर्व सण छान साजरा करू शकतो “. तुम्ही आम्हा सर्व बहिणींचे काळजी घेतात. तुमच्या या त्यागाचा आम्ही कधीच ऋण फेडू शकणार नाही…असा विचार पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला. आम्ही सर्व बहिणी तुम्हाला नतमस्तक आहोत व तुम्हास वंदन करतो..
सैनिकांसाठी राखी पाठवून, ‘आपण सर्व एक कुटुंब आहोत’ हा संदेश विद्यार्थिनींनी देशाला दिला.”

दरम्यान, स्व. प. म. राऊत सर यांनी स्थापन केलेली विद्या विकास माध्यमिक शाळा , मौजे- वांगणी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- २०२४, पुरस्कार प्राप्त मराठी माध्यमाची अनुदानित शाळा आहे.
या शाळेत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना राखी बांधून प्रेम, ऐक्य व बंधुत्वाचा संदेश दिला. या निमित्ताने शिक्षकांनी सणाचे महत्त्व सांगितले व बहीण –भावाच्या पवित्र नात्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
















