
इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वप्न साकार
रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’ कडे हस्तांतरीत करण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई, दि.10 फेब्रुवारी 2026: इंदापूर तालुक्यात औद्योगिक क्रांतीची नांदी देणारा मोठा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रत्नपुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्यास मंजुरी मिळाल्याने नवी पंचतारांकीत औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री मा.दत्तात्रय भरणे यांनी दिली. ही जमीन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची असून आता एमआयडीसी कडे सुपूर्त झाली आहे.
अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष आभार व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय झाल्याने त्याला विशेष राजकीय व भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ही संकल्पना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली होती. इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग यावेत, स्थानिक तरुणांना घराजवळ रोजगार मिळावा आणि तालुक्याचा आर्थिक चेहरामोहरा बदलावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या स्वप्नपूर्तीकडे टाकलेले हे निर्णायक पाऊल मानले जात आहे.
इंदापूरचे आमदार म्हणून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय प्रक्रियेला वेग दिला.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले“दिवंगत अजितदादांनी इंदापूरच्या औद्योगिक विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल पडले आहे. रत्नपुरी मळ्यात उभी राहणारी एमआयडीसी हजारो युवकांना रोजगार देईल, स्थानिक उद्योजकांना संधी निर्माण करेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ देईल. इंदापूरचा चेहरामोहरा बदलण्याचा हा प्रारंभ आहे. ”
या निर्णयामुळे इंदापूरमध्ये गुंतवणुकीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. उद्योग, रोजगार, व्यवसाय, सेवा क्षेत्र अशा सर्व स्तरांवर मोठी आर्थिक चक्रे फिरू लागतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. इंदापूर आता केवळ कृषी तालुका न राहता आता औद्योगिक नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.















