सांगली, १३ मे :कामेरी येथील ९४ वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मिरज कोरोना रुग्णालयातुन करोनामुक्त ९४ वर्षीय आजीला डिस्चार्ज दिला आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देत डिस्चार्ज देण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९४ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. या महिलेवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. त्यांची काळजी घेण्यात आली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे ९४ वर्षे कोरोनामुक्त झाल्या. आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून १४ दिवसानंतर आजींची स्वाब टेस्ट घेण्यात आली. दोन टेस्ट मध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा मिरजेतील कोरोनाच्या रुग्णालयात दोन वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावरही यशस्वी उपचार करून त्यालाही कोरोनामुक्त करण्यात आले आहे.
सर्वच रुग्णांना या हॉस्पिटलचे डॉक्टर्स व सर्व स्टाफ अत्यंत चांगल्या प्रकारे व गुणवत्तापूर्ण सेवा देतात. रुग्ण हा केंद्रबिंदू समजून सेवा दिली जाते. जिल्हा प्रशासन व कोविड हॉस्पिटल यांच्यात अत्यंत चांगला समन्वय आहे.
अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज हे कोविड-19 हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले असून या हॉस्पिटलने आतापर्यंत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी अत्यंत नेटके नियोजन आहे. ९४ वर्षाच्या आजीबाईंना या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने अत्यंत भक्तीभावे सेवा दिली असून आता त्यांची तब्येत स्थिर आहे. इथून पुढेही १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक गिरीगोसावी. डॉ रुपेश शिंदे, एम एस मूर्ती, वंदना शहाणे,यांच्यासह सर्व डॉक्टर,नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.