रत्नागिरी : जिल्हयातील नऊ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि काही ठिकाणी गाव पॅनलला संमिश्र यश मिळालं. मुख्य म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. याठिकाणी शिवसेना विरोधात ग्रामविकास आघाडी अशी लढत होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने कुवारबाव ग्रामपंचायत प्रतिष्ठेची केली होती. मात्र या ग्रामपंचायत निवडणूकित ग्रामविकास आघाडीने शिवसेनेला चांगलीच धूळ चारली. ग्रामविकास आघाडीने शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली आणि सरपंच पदासह 15 पैकी 8 सदस्य निवडून आणले. ग्रामविकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार मंजिरी पाडाळकर इथं 98 मतांनी विजयी झाल्या. सत्ताधारी शिवसेनेला इथे चांगलाच दणका बसला आहे.
चिपळूण व रत्नागिरी या चार तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली होती. यातील खेड तालुक्यातील सवणस व चिपळूणमधील दोणवली तर रत्नागिरी तालुक्यातील रानपाट या तीन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात येथील ग्रामस्थांना यश आले होतं. तर रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य बिनविरोध निवड झाले होते. त्यामुळे इथे सरपंचपदासाठी दुहेरी लढत होती.
दरम्यान आज जाहीर झालेल्या निकालामध्ये रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ आणि पोमेंडी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत, तर दापोलीतील करंजाळी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी तर सोंडेघरमध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. तर खेडमधील खोपीमध्ये राष्ट्रवादी आणि सवणसमध्ये गाव पॅनलचे सरपंच निवडून आले आहेत.