
रत्नागिरी : जिल्हयातील नऊ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. रत्नागिरी तालुक्यातील बहूचर्चित कुवारबाव ग्रामपंचातीसाठी सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासाठी सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. नऊ ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सोमवारी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.
दापोली, खेड, चिपळूण व रत्नागिरी या चार तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली होती. त्यामध्ये दापोलीतील करंजाळी व सोंडेघर, खेडमधील सवणस खुर्द, खोपी व सवणस, चिपळूण तालुक्यातील दोणवली व मार्गताम्हाणे तर रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ, रानपाट, कुवारबाव, पोमेंडी खुर्द या गावांचा समावेश होता. मात्र यातील खेड तालुक्यातील सवणस व चिपळूणमधील दोणवली तर रत्नागिरी तालुक्यातील रानपाट या तीन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात येथील ग्रामस्थांना यश आले होते.
खेड तालुक्यातील सवणस खुर्द येथे सरपंचपद बिनविरोध झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य बिनविरोध निवड झाली आहे तर सरपंचपदासाठी दुहेरी लढत होती. कुवारबावमध्ये तीन प्रभागात पंधरा जागांसाठी तीस उमेदवार रिंगणात होते. थेट सरपंचपदासाठीही दुहेरी लढत होती. याठिकाणी शिवसेना विरोधात ग्रामविकास आघाडी अशी लढत होत आहे. महाराष्टल स्वाभिमान पक्षासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने शिवसेनेसाठी कुवारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कुवारबाव ग्रामपंचायतीच्या शेजारीच असणाजया पोमेंडी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये पाच सदस्य बिनविरोध झाले असून, सरपंच व दोन सदस्य जागांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली.
कुवारबावमध्ये 4,351 मतदारांमध्ये पुरुष 2,251 आणि स्त्री मतदार 2,099 आहेत. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 2,569 मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजता 71 टक्के मतदान झाले. पेामेंडीत 784 मतदारांमध्ये पुरुष 394 व स्त्री 390 मतदार आहेत. दुपारपर्यंत 546 मतदारांनी मतदान केले. सायंकाळपर्यंत 84 टक्के मतदारांनी हक्क बजावला. लाजुळमध्ये 1,488 मतदार असून त्यात पुरुष 730 आणि स्त्री मतदार 758 आहेत. दुपारपर्यंत 1,123 मतदारांनी मतदान केले. सायंकाळपर्यंत 80 टक्के मतदार झाले होते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रकियेचा निकाल सोमवारी सकाळीच तहसिलदार स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे.
चिपळूण तालुक्यात मार्गताम्हाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहा सदस्य बिनविरोध झाले. एक सदस्य पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. तर थेट सरपंचपदासाठी चौरंगी लढत झाल्याने चुरस होती. खेड तालुक्यातील खोपी ग्रा.पंच्या निवडणुकीतही थेट सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात उरले होते. याठिकाणी एक सदस्य बिनविरोध झाला असून आठ सदस्य पदासाठी सोळा उमेदवार निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रकियेचा निकाल सोमवारी सकाळीच तहसिलदार स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे.















