नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये 114जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून 7180 कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या राज्यपाल परिषदेच्या समारोपप्रसंगी आज केली.
राष्ट्रपती भवनात झालेल्या दोन दिवसीय राज्यपाल परिषदमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये नवभारत 2022 मधील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास त्याचबरोबर राज्य आणि राजभवनाच्या माध्यमांचा पुढाकारातून करण्यात आलेले उपक्रम याविषयी चर्चा करण्यात आली.
2022 मध्ये नवभारताच्या विकासाचे लक्ष्य साधण्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना भारतीय राज्यघटनेचा 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेले अधिकार बहाल करावे जेणेकरून सामान्य नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देणे त्यांना शक्य होणार आहे, अशी मागणी राज्यपालांनी’सार्वजनिक सेवेमधील आमूलाग्र बदल’ या विषयावरील परिसंवादात केला.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना राज्यपाल म्हणाले की, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यातील समन्वयात सुधारणा होणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने रेल्वे पोलीस दलात आवश्यकतेप्रमाणे संख्याबळ वाढविण्याची विनंती देखील राज्यपालांनी यावेळी केली.
महाराष्ट्रातील आदिवासी आणि दुर्गम भागात मोबाईल आणि दूरध्वनीची कनेक्टिव्हिटी नसल्याने आरोग्य सुविधा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतील ॲम्ब्युलन्स सेवा पुरविताना विशेष करून गरोदर मातांना संस्थात्मक बाळंतपणासाठी नेताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. नंदूरबार, गडचिरोली,नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात ही समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास कार्यक्रमावरील मुद्यावर बोलताना राज्यपाल म्हणाले की,महाराष्ट्रात नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्याची गरज आहे. नर्सेसना असलेली मागणी आणि त्या प्रमाणात उपलब्ध संख्या लक्षात घेता अशा प्रकारचे नर्सिंग कॉलेज सुरू होणे काळाची गरज आहे. त्यासाठी एक वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा जेणेकरून मोठ्या प्रमाणावर मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सौर चरखा, बांबूपासून वस्तूंची निर्मिती, मधुमक्षिका पालन यासह अन्य उपक्रमांसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या मुद्द्यावर राज्यपालांनी भर दिला त्याला जोडूनच ते पुढे म्हणाले की, संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास कक्ष स्थापन करावेत.
महाराष्ट्राच्या राजभवनमध्ये सुरू केलेल्या उपक्रमांबाबत सांगतांना राज्यपाल म्हणाले की, पुण्यातील राजभवन मध्ये एक मेगावॅट सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरू केला असून देशातील सर्व राजभवनामधील तो एक सर्वात मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प ठरला आहे.
तामिळनाडूच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना 400 किलो वॅट सोलर ऊर्जा प्रकल्प चेन्नईच्या राजभवनात उभारला असून तो देशातील राजभवनांमधील तो द्वितीय क्रमांकाचा सौर प्रकल्प ठरला आहे. देशांतील अन्य राजभावनांमध्येही अशा प्रकारचे सौर ऊर्जेवरील प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील राजभवनमध्ये असलेल्या बंकरच्या संवर्धनाविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले की, या बँकरमध्ये आधुनिक म्युझियम करण्यात येणार असून त्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास,संस्कृती आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेला त्याचा सहभाग याविषयी माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. केंद्रीय पर्यटन विभागाने या बंकरच्या संवर्धनासाठी आणि म्युझियमच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी केली