रत्नागिरी, विशेष प्रतिनिधी ः रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी पार पडलेल्या प्रक्रियेत 70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. खेड, मंडगणड तालुक्यातील किरकोळ वादा व्यतिरिक्त अन्य कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. तर रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.
360 ग्रामपंचायतींसाठी झालं मतदान
जिल्ह्यात एकूण 479 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 360 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. 914 प्रभागांमध्ये 2009 जागांसाठी 4332उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.
साडेतीन वाजेपर्यंत 59.78 टक्के मतदान
सकाळच्या पहिल्या टप्प्यात 15 टक्केच मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढू लागला . सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत 69 हजार 243 मतदान झाले . 9.30 ते 11.30 वाजेपर्यंतच्या काळात 33.98 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर थोडा ओघ ओसरला . 3.30 वाजेपर्यंत 2 लाख 74 हजार 443 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या कालावधीत 59.78 टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर व दापोलीमध्ये मिळून पाच मतदान यंत्र बंद पडली. ती तात्काळ बदलण्यात आली. त्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
खेडमधील भरणेमध्ये बाचाबाची
भरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या दरम्यान मनसेचे सुजीत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष गोवळकर यांना ठोसा लगावल्याने संपुर्ण मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. या प्रकरणी खेड पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. भरणे येथील प्रकार वगळता तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की आणि खेडच्या तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.