सर्वात प्रथम कोकणवृत्तवर
रत्नागिरी, (आरकेजी) : वयाचे सातवे वर्षे म्हणजे खेळण्यातली कार घेऊन खेळायचे वय. परंतु, ते सोडून खरोखरची कार चालवून तिला खेळणे बनवायचे काम चिपळूण तालुक्यातील लवेल पंचक्रोशीतील एक चिमुकली करत आहे. स्वत:च्या हाताने स्टेअरींग पकडून अल्टो, झायलो, वेगेनोर या गाड्या सहजपणे चालवून ती नागरिकांच्या अभिमानाचा विषय झाली आहे. पायल प्रमोद नागे असे तीचे नाव आहे.
लवेल पंचक्रोशीतील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय कर्मचारी वसाहतीत ती कुटुंबासह राहते. लहानपणापासून वडील आणि मामाच्या शेजारी बसून ते कसे कार चालवतात याचे निरिक्षण तिने केले आणि त्याच आधारे कार चालवायला ती शिकली. कार चालवण्यासाठी अनेकजण मोटार ट्रेनिंग स्कूलला प्रवेश घेतात. परंतु, कोणतेही प्रशिक्षण न घेता पायलने केवळ निरिक्षणातून सहजासहजी कार ड्रायव्हींगचे कसब प्राप्त केले आहे. आपण कार चालवावी, शिकावे असे अनेकांना वाटते, परंतु भितीपोटी ते कार शिकणे टाळतात. अशांनाही पायलमुळे प्रेरणा मिळत आहे.
पायल ही एसपीपीएल इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेची विद्यार्थीनी असून दुसरी इयत्तेत शिकते. कोणाचीही मदत न घेता मोकळ्या मैदानावर ती कार चालवते. कार चालवण्यासाठी आवश्यक असणार्या स्टार्ट, एक्सीलेटर, ब्रेक, गिअर, क्लच, स्टेअरींग या तांत्रिक बाबीही ती शिकली आहे. त्यामुळे कार चालवणे तिला अधिक सोपे गेले आहे. दरम्यान, नागे कुटुंबाचे मूळ गाव शिरगाव हे आहे. कामानिमित्त ते लेवेल येथे राहतात. पायल हिचे वडील हे घरडा महाविद्यालयात लिपीक या पदावर कार्यरत आहेत.
>>>>>>>>>>>>>
लहानपणापासून पायल मला कार चालवताना पाहत आहे. ती हट्ट करायची, मला कार चालवायची आहे. साधारण महिनाभरापूर्वी तीला चालक बसतो, तीथे बसवले आणि त्यावेळी तीने कार सुरू करून दाखविली. त्यावेळी तिसरा गिअर चुकून पडू नये यासाठी तीच्या शेजारी बसलो. आश्चर्य म्हणजे तीने व्यवस्थितपणे कार चालविली. तिच्यातील आत्मविश्वास आणखी वाढला आणि आता तर ती बिनधास्तपणे कार चालवते, याचे वडील म्हणून नेहमीच कौतुक वाटते, असे पायलचे वडील प्रमोद यांनी सांगितले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>