रत्नागिरी, प्रतिनिधी : सात दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर आज जिल्हा अनलॉक झाल्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसत होती. गेले सात दिवस वैद्यकीय, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होती. मात्र आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी 9 ते 4 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.
अर्धा महाराष्ट्र सोमवारपासून अनलाॅक झाला असला, तरी रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद होता. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 3 जून पासून 9 जूनपर्यंत (बुधवार) कडक लाॅकडाऊन केला होता. मात्र आजपासून हा कडकलाॅक डाऊन शिथील करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानं उघडी राहणार आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच रत्नागिरीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी पहायला मिळाली. रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी होती. आज अत्यावश्यत सेवेतील दुकाने सकाळी 9 ते 4 वाजेपर्यत सुरु असणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून कडक लाॅक डाऊन असल्याने आज रत्नागिरीकरांनी बाजारात तुफान गर्दी केली होती. पावसाळी सामानापासून ते भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली पहायला मिळाली.
नवीन आदेशानुसार काय सुरू/ काय बंद
नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत अनेक घटक वाढवण्यात आले आहेत . अत्यावश्यक सेवेशी सबंधित सर्व दुकाने व अस्थापना या नव्या आदेशामुळे सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत . शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुर्णवेळ संचारबंदी शिवाय रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्यानुसार जिल्ह्यात रुग्णालये , रोग निदान केंद्रे , क्लिनिक्स , लसीकरण केंद्रे , वैद्यकीय विमा कार्यालये , औषध दुकाने , औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यामध्ये सहाय्यभूत निर्मिती आणि वितरण युनीटस्सह विक्रेते , वाहतुकदार व पुरवठा साखळी याचा समावेश असेल . त्याशिवाय लस , सॅनिटायझर , मास्क , वैदयकीय उपकरणे आणि त्यास पुरक कच्चा माल निर्मिती उदयोग व सहाय्यभुत सेवा यांचाही समावेश असेल . पशुवैदयकीय सेवा व पाळीव प्राणी काळजी केंद्र व त्यांची खादय दुकाने , वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज सुरु राहतील.
याशिवाय किराणा सामान दुकाने , भाजीपाला दुकाने , फळविक्रेते , दुध डेअरी , बेकरी , मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने सुरू राहणार आहेत . शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील . शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा तसेच विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा सुरू राहतील . स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे आणि स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा सुरु राहतील . व्यायामशाळा , केशकर्तनालय दुकाने , ब्युटी पार्लर्स , स्पा , वेलनेस सेंटर्स , सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील . रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा , सेबी प्राधिकृत बाजार व कार्यालये , स्टॉक एक्सेज व त्यासंबंधित अन्य आस्थापना दुरध्वनी संबंधित सेवा देखील सुरू करण्याची मुभा असणार आहे . मालाची आणि वस्तुंची वाहतुक , पाणी पुरवठा सेवा पुन्हा सुरू करता येणार आहेत . कृषी विषयक सेवा सुरळीतपणे चालू ठेवणेसाठी आवश्यक शाखा यामध्ये शेतीच्या साधनांची उपलब्धता , बियाणे , खते , कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती यांचा समावेश राहील . सर्व वस्तूंची आयात – निर्यात , ई कॉमर्स . ( अत्यावश्यक माल आणि सेवा यांचा पुरवठा ) सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.
मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियम उत्पादने , सर्व कार्गो सेवा , डेटा सेंटर – क्लाऊड सींस , आय टी सेवा ज्या पायाभुत सुविधा आणि सेवा पुरवितात त्या सुरू करता येणार आहेत . सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा , विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा , एटीएम सेवा , टपाल सेवा , बंदरे आणि त्यासंबंधीच्या कृती देखील गुरुवारपासून सुरू करता येणार आहेत . लस – जीवनरक्षक औषधे , औषधी उत्पादने यांचे संबंधी वाहतूक करणारे कस्टम हाऊस एजंटपरवानाधारक मल्टी मोडल ऑपरेटर्स , कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल – पॅकेजींग साहित्य बनविणाऱ्या आस्थापना याना देखील मुभा असणार आहे . आगामी पावसाळयासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने , स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.