नवी दिल्ली : ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन, राजू मिश्रा, भावन सोमय्या आणि राधाकृष्ण जगरलामुद्री या परीक्षकांनी या पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ३ मे २०१७ रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जातील.
जाहीर झालेले पुरस्कार : ‘कासव’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, सथमनम भवतीला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, अभिनेता अक्षय कुमारला ‘रुस्तम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सुरभि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
सर्वाधिक चित्रपट-स्नेही राज्याचा पुरस्कार उत्तर प्रदेशला, झारखंडला विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला.
फायरफ्लाईजला नॉन-फिचर चित्रपट विभागात पुरस्कार मिळाला. सोनम कपूरला नीरजा चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट मोरन चित्रपटाचा पुरस्कार ‘हांडूक’ ला तर सर्वोत्कृष्ट तुलू चित्रपटाचा पुरस्कार मडिपुला जाहीर झाला.
चित्रपटाचा विषय, ब्रॅण्ड, कराचा प्रभाव आणि तिकिट दर अशा विविध बाबींचे सखोल विश्लेषण करणाऱ्या जी. धनंजयन यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अ फ्लाय इन द करी’ पुरस्कासाठी के. पी. जयशंकर आणि अंजली माँटेरो यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार घोषित झाला आहे. चित्रपटविषयक सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार ‘लता-सूर गाथा’ ला मिळाला आहे.
विविध प्रकारच्या भूमिका साकारणारे मोहनलाल यांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट निर्मितीत स्थानिक गुणवत्तेला संधी दिल्याबद्दल झारखंडला विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे.