मुंबई : राज्यात पारंपरिक विटांची निर्मिती करत असताना 50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले.
आज मंत्रालयात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या कदम शिष्टमंडळाने पारंपरिक वीट भट्टीसंदर्भात पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पर्यावरण मंत्री बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कदम म्हणाले, एकावेळी 50 हजारापेक्षा कमी विटांची निर्मिती करत असल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक नसेल. मात्र 50 हजारापेक्षा जास्त वीट निर्मिती करत असतील तर अशा वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील. तसेच एकावेळी 50 हजारांची निर्मिती केल्यानंतर तीन दिवसांनंतरच दुसरी वीट भट्टी लावण्यात यावी. वीट भट्टीचे ठिकाण एक हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीपासून आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून कमीत कमी 200 मीटर अंतराच्या पुढे असावे, असेही पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००