Bulandshahar : १७ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील नेत्यांची बैठक बुलंदशहर येथे झाली. बुलंदशहरच्या किसान सभेच्या हजारो कार्यकर्त्यांनी बीकेयु (टिकैत) व इतर किसान संघटनांच्या साथीने दिल्लीजवळ गाझीपूरची सीमा गेले ९ महिने अत्यंत चिकाटीने लढवली आहे.बैठकीचा मुख्य उद्देश संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलेल्या ‘मिशन उत्तर प्रदेश-उत्तराखंड’चे उदघाटन करण्याकरता ५ सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर येथे ठरलेली विराट किसान महापंचायत यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे हजारों शेतकरी संघटित करणे हा होता. या ‘मिशन’ची हाक या दोन्ही राज्यांतील भाजपच्या शेतकरीविरोधी, जनताविरोधी, धर्मांध व हुकूमशाही सरकारांचा येत्या सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकींत पराभव करण्यासाठी देण्यात आली आहे. किसान सभेची संघटना जास्त मजबूत करण्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली. दोन्ही मुद्द्यांवर चर्चेअंती काही ठोस निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सहसचिव विजू कृष्णन व बादल सरोज, कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, उत्तर प्रदेश किसान सभेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष डी. पी. सिंह, सहसचिव चंद्रपाल सिंह, जगवीर भाटी व मूलचंद सिंह उपस्थित होते.















