मुंबईतील नागरिकांची अवस्था किंचित बरी (38.2 टक्के), 15.4 टक्के जणांना मास्कड हायपरटेन्शन आणि 22.8 टक्के जणांना व्हाईट-कोट हायपरटेन्शन असल्याचे निरीक्षण
मुंबई : भारतीय नागरीक रक्तदाब व मधुमेह तापासणीसाठी प्रथम क्लिनिकमध्ये जातो, त्यावेळी त्याच्या मास्कड उच्च रक्तदाब आणि व्हाईट-कोट उच्च रक्तदाब यांचे प्रमाण 42 टक्के इतके असते, असा निष्कर्ष इंडिया हार्ट स्टडी (आय.एच.एस.) च्या एका अभ्यासात आढळला आहे. तसेच, हृदयाचे ठोके सामान्यतः 72 प्रति मिनिट इतके असणे अपेक्षित असताना, भारतीयांमध्ये हृदयाचे ठोके हे दर मिनिटाला साधारणपणे 80 प्रति मिनिट इतके पडतात, असेही या अभ्यासात दिसून आले आहे.
या अभ्यासामध्ये मुंबईतील 1643 जणांवर चाचण्या घेण्यात आल्या.
· यातील 15.4 टक्के जणांना स्वतःला उच्च रक्तदाब असल्याची जाणीवच नसल्याचे (मास्कड हायपरटेन्शन) दिसून आले,
· तर 22.8 टक्के जणांना व्हाईट-कोट हायपरटेन्शन असल्याचे आणि त्यामुळे त्यांचे ते निदान चुकीचे ठरत असल्याचे आढळून आले.
हा अभ्यास घेण्यात आलेल्या इतर ठिकाणांच्या तुलनेत 50 टक्के सहभागासह, अधिक स्त्रिया आरोग्याबद्दल जागरूक असल्याचे दिसून आले.
या अभ्यासाचा आणखी एक उल्लेखनीय निष्कर्ष हा आहे, की इतर देशांप्रमाणेच भारतीयांचाही सकाळच्या तुलनेत संध्याकाळी उच्च रक्तदाब जास्त असतो. त्यामुळे रक्तदाबावर औषध देताना, डोसचे प्रमाण कोणत्या वेळी किती असावे, याचे मार्गदर्शन डॉक्टरांना देण्याची गरज आहे. उच्च रक्तदाबावरील कोणत्याही उपचारात औषधाच्या निवडीचा देखील विचार केला पाहिजे, ज्यामुळे उच्च हृदय गती कमी होण्यास मदत होईल.
नवी दिल्लीतील ‘बीएचएमआरसी’मधील अॅकेडमिक्स व रिसर्च विभागाचे डीन, बत्रा हार्ट सेंटरचे अध्यक्ष, प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. उपेंद्र कौल यांच्या मार्गदर्सनाखाली हा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “भारतात उच्च रक्तदाबाच्या क्लिनिकल व्यवस्थापनाची मोठी आवश्यकता असल्याचे इंडिया हार्ट स्टडीचा अहवाल दर्शवितो. हा अभ्यास खास भारतीयांसाठी करण्यात आला असून भारतीयांमधील उच्च रक्तदाबाचे निदान करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती बनविण्यास तो मदत करील. या अभ्यासामध्ये उच्च रक्तदाबाच्या विविध पैलूंचा विस्तृत डेटा सादर करण्यात आला आहे.”
नेदरलॅंडच्या मास्ट्रिच येथील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी संशोधन संस्थेतील अभ्यासक डॉ. विलेम व्हर्बर्क हे या अभ्यासातील मुख्य तपासनीस होते. ते म्हणाले, “उच्च रक्तदाब अचूकपणे मोजण्यासाठी तो घरीच तपासावा, अशी आम्ही शिफारस करतो. अर्थात, अनेक रूग्णांमध्ये मधुमेहासारखे इतरही काही आजार असू शकतात, त्यामुळे अशा रुग्णांनी घरी रक्तदाब तपासताना वैधकृत उपकरणांचा वापर करणे महत्वाचे ठरते. गर्भवती महिला, पौगंडावस्थेतील आणि मूत्रपिंडाचा विकार असलेल्या लोकांसाठी होम ब्लड प्रेशर मॉनिटर्स स्वतंत्रपणे प्रमाणित करणे आवश्यक आहे. ”
एरिस लाइफ सायन्सेसने ‘इंडिया हार्ट स्टडी’ हा अभ्यास, बत्रा हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च सेंटर या संस्थेच्या अधिपत्याखाली राबविला.
‘एरिस लाइफ सायन्सेस’चे प्रेसिडेंट – मेडिकल डॉ. विराज सुवर्णा म्हणाले, “मास्कड हायपरटेन्शन ही अवस्था धोकादायक असते, कारण तिचे निदान योग्य रितीने होत नाही. क्लिनिकमध्ये न जाता घरीदेखील रक्तदाबाचे परीक्षण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार होणे महत्वाचे आहे. उच्च रक्तदाबाचे अचूक परीक्षण करण्यातूनच आपण या आजारावर मात करू शकतो आणि आरोग्य सुधारू शकतो.
हिंदुजा हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट आणि मुंबई येथील ‘आयएचएस’चे समन्वयक डॉ. सी. के. पोंडे यावेळी म्हणाले, “अनियंत्रित उच्च रक्तदाब, म्हणजे हायपरटेन्शन, हे हृदयविकाराचा झटका वाढण्याचे देशातील सर्वात सामान्य कारण आहे. ही लक्षणे लवकर दिसून येत नसल्यामुळे, उच्च रक्तदाबाचे अस्तित्व शोधणे कठिण आहे. हृदयाचे जास्त ठोके पडणे यातून आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते.”
मुंबईच्या होली फॅमिली हॉस्पिटलचे डॉ. ब्रायन पिंटो हेही आयएचएसच्या समन्वयकांमध्ये सहभागी होते. त्यांच्या मते, “मुंबईत घेतलेल्या चाचण्यांमधील 15 टक्के नागरिकांना आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची जाणीवच नसल्याचे (मास्कड हायपरटेन्शन) दिसून आले आहे. याचे या रुग्णांवर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”
व्हाईट-कोट हायपरटेन्शन असणाऱ्यांचे चुकीचे निदान होते व त्यांना उच्च रक्तदाबावरील औषधे अनावश्यकरित्या घ्यावी लागतात. अशा व्यक्तींमध्ये हायपोटेन्शन (कमी रक्तदाब, 90/60 पेक्षा कमी) होण्याचा धोकादेखील असतो. दुसरीकडे, मास्कड हायपरटेन्शन असलेल्यांचे निदान चुकीचे होऊन त्यांच्यामध्ये हृदय, मूत्रपिंड आणि मेंदू यांच्या आजारांची गुंतागुंत होण्याचा आणि त्यामुळे अकाली मृत्यू होण्याचा धोका संभवतो.
“उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडांसह शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होतो. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचा तीव्र रोग होऊ शकतो, त्यामुळे आजार व्यवस्थापनात गुंतागुंत होते, असे प्रख्यात नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत राजपूत यांनी सांगितले.
या अभ्यासाचे वेगळेपण असे, की त्यामध्ये रक्तदाबाच्या तपासण्या या औषधांची अजिबात सवय नसलेल्या नागरिकांवर अत्यंत व्यापक पद्धतीने घेण्यात आल्या. 15 राज्यांमध्ये, नऊ महिन्यांच्या कालावधीत 1233 डॉक्टरांनी 18,918 नागरिकांची (पुरुष आणि महिला) रक्तदाब तपासणी केली. या तपासण्यांमध्ये सहभागी झालेल्यांच्या रक्तदाबाचे त्यांच्या घरीच दिवसातून चार वेळा असे सलग 7 दिवस निरीक्षण करण्यात आले होते.