भुवनेश्वर, दि. २३ सेप्टेंबर (क्री. प्र.) : येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या ४०व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार खो खो स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राच्या मुलांनी व मुलींनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
मुलांच्या गटात महाराष्ट्राने आसामचा १५-१० असा एक डाव राखून ५ गुणांनी पराभव केला. सूरज जोहरे व आदित्य कुदळे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद करीत दोघांनी प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण केले. दुसऱ्या डावात किरण वसावे व भगतसिंग वसावे यांनी अनुक्रमे २.०० व २.१० मिनिटे संरक्षण केले. आसामच्या पप्पू गोगाई याने (१.३० मिनिटे संरक्षण) एकाकी लढत दिली.
मुलींच्या गटातील सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने आसामवर २४-९ असा एक डाव राखून १५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राची दिपाली राठोड (२.२०मिनिटे संरक्षण व ६ गुण) व कौशल्या पवार (१.२० व १.४० मिनिटे संरक्षण आणि ५ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. तत्पूर्वी पहिल्या डावात अश्विनी शिंदे (२.०० मिनिटे संरक्षण), सरिता दिव्या व जानव्ही पेठे (प्रत्येकी २.१० मिनिटे संरक्षण) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली.
अन्य निकाल :
मुले :
मध्य भारत विजयी वि. पंजाब २५-११, केरळ विजयी वि. झारखंड १८-१४,
ओरिसा विजयी वि. बिहार ३८-४, तामिळनाडू विजयी वि. पाँडिचेरी ११-५,
हरियाणा विजयी वि. उत्तराखंड १४-११, आंध्रप्रदेश विजयी वि. दादर हवेली १६-६,
कर्नाटक विजयी वि. मध्य प्रदेश २७-११, दिल्ली विजयी वि. हिमाचल प्रदेश १८-७,
पश्चिम बंगाल विजयी वि. त्रिपुरा २३-४.
मुली :
पंजाब विजयी वि. छत्तीसगड ९-६, पश्चिम बंगाल विजयी वि. मध्य प्रदेश २३-८,
मणिपूर विजयी वि. आंध्रप्रदेश १२-९, राजस्थान विजयी वि. पाँडिचेरी १५-५,
केरळ विजयी वि. बिहार १६-५, दिल्ली विजयी वि. दादर हवेली ३५-०.















