रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आज एकाच दिवशी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी संध्याकाळी उशिरा हे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यामध्ये संगमेश्वर मधील दोन आणि दापोली तालुक्यात दोन नवे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे 4 रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांत एकूण 9 रुग्ण सापडले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा काही दिवसांपूर्वी शून्यावर आला होता. मात्र गेल्या चार दिवसांत ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9 वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे..
शनिवारी जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये हे दोन्ही रुग्ण सापडले होते. हे दोन्ही रुग्ण मुंबई तसेच ठाण्यातून आले होते.
त्यानंतर रविवारी देखील जिल्ह्यात दोन नवे कोरोनाचे रुग्ण सापडले, यामध्ये मुंबईतून मंडणगडमधील तिढे येथे चालत आलेला एक व्यक्ती, तर दुसरी व्यक्ती संगमेश्वर तालुक्यातील पूर गावची महिला होती. हे दोघेही मुंबईतून आले होते. त्यानंतर सोमवारी देखील दापोली तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला. मुंबईतून आलेल्या 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तीन दिवसांत 5 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडले. आज (मंगळवार) तब्बल 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये दापोलीतील वनौशी तर्फे पंचनदी आणि शिरधे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील मुरडवे येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. आज संध्याकाळी उशिरा या चौघांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 9 वर पोहचली आहे. यापूर्वी 6 रुग्ण सापडले होते. त्यातील एकाचा मृत्यू तर 5 जण कोरोनामुक्त झाले होते.