डोंबिवली : केंद्र शासनाने जम्मू काश्मीर मधील कलम ३७० मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा गृहमंत्री शहा यांनी राज्यसभेत केली. या ऐतिहासिक निर्णयामुळे डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत जल्लोष साजरा करून पेढे वाटण्यात आले.
पूर्वेकडील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशेजारील छ. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कल्याण जिल्हा शिवसेना प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली या जल्लोष्याला प्रारंभ झाला. यावेळी महापौर विनिता राणे, कल्याण उप जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, महिला संघटक कविता गावंड, किरण मोंडकर, स्मिता बाबर, किशोर मानकामे, संजय पावसे, राहुल म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व महिला पुरुष सैनिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
‘शिवसेना झिंदाबाद’, ‘वंदे मातरम’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘नरेंद्र मोदी आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी गोपाळ लांडगे म्हणाले, 370 कलम रद्द व्हावे ही सर्व नागरिकांची मागणी होती. काश्मीर मध्ये दोन-दोन झेंडे हे पटत नव्हते. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 307 कलम रद्द करा अशी मागणी मागील सरकारला केली होती. पण याकडे लक्ष दिल नाही. एका विशिष्ट धर्माचे कौतुक केले जात होते. पण युतीच्या सरकारातील पंतप्रधान नरेद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण केलं आहे. आता खऱ्या अर्थाने काश्मीरचा प्रश्न सुटणार आहे, केंद्र सरकारचे अभिनंदन.