रत्नागिरी, (आरकेजी) : गंभीर गुन्हा करून तब्बल ३४ वर्षे फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आवळल्या. शहरातील कोकण नगर येथे लग्नसमारंभासाठी हा आरोपी आला होता. पुढील कारवाईसाठी त्याला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जलील फकीर अलिमियॉ बुडये(५१, रा. राजीवडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बुडये याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात १९८३ मध्ये भा.दं.वि. कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल केल्यापासून तो फरार होता. शोध घेवूनही पोलिसांना सापडत नव्हता. त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप देखील दाखल करण्यात आले होते.
जिल्ह्यातील फरारी असलेल्या अभिलेखावरील आरोपींच्या शोधाकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. शिरिष सासने व जिल्हा विशेष शाखेचे पो.नि. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जलील बुडये याच्याबाबत माहिती घेतली असता बुडये हा त्याच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभाकरिता कोकण नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.
२० ऑक्टोबर रोजी लग्न समारंभाला बुडये आल्याची पोलीसांची खात्री झाली. त्यावेळी लग्न समारंभ संपल्यानंतर बुडये याला पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये पो.ऊ.नि. रवीराज फडणीस, पो.ना. मिलिंद कदम, पो.हे.कॉ. संदीप कोळंबेकर, सुशील पंडीत, राकेश बागुल, विजय आंबेकर, उदय वाजे, गुरु महाडिक, रमीज शेख यांनी सहभाग घेतला.