रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. येथील ५५ पैकी ३९ जागांवर शिवसेनेने विजयश्री प्राप्त केली आहे. रत्नागिरीत १०, संगमेश्वर ७, मंडणगड १, दापोली ३, खेड ४, गुहागर १, लांजा ४, चिपळूण ५, तर राजापूर ४ अशा ३९ जागांवर शिवसेनेला यश मिळाले आहे. अध्यक्षपद मिळावे, यासाठी संगमेश्वर आणी लांजा तालुक्यात चुरस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कोणत्या तालुक्याकडे जाते, याची उत्कंठा ताणून राहिली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे यावेळी सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. सध्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा गटातून विजयी झालेल्या सेनेच्या रचना महाडिक आणि लांजा तालुक्यातील गवाणे गटातून विजयी झालेल्या स्वरूपा साळवी यांची नावे चर्चेत आहेत.
रचना या शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी आहेत. यापूर्वी त्यांनी हे पद भूषवले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. रचना यांनी सेना बंडखोर राजेश मुकादम यांना पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातही शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महाडिक यांचे पारडे जड आहे.
लांजा तालुक्यातल्या गवाणे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या स्वरूपा साळवी यांचे नावही त्यासाठी चर्चेत आहे. स्वरूपा तिसर्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी यापूर्वी लांजा तालुक्यातल्या महिला सदस्याला मिळालेले नाही. त्यामुळे अनुभवी असलेल्या साळवी यांचे नाव चर्चेत आहे.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर विरुद्ध लांजा असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.