रत्नागिरी (आरकेजी): हर्णै बंदरातील ५ बोटी उलटून झालेल्या दुर्घटनेत ३ खलाशी बेपत्ता झाले होते. त्यापैकी एक जण सुखरूप असून एका खालाशाचा मृतदेह लाडघर किनारपट्टीला सापडला. तर एक खलाशी अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
हर्णे समुद्रात मंगळवारी ५ नौकांना जलसमाधी मिळाली होती. यासर्व नौकावर एकूण २९ खलाशी होते. त्यापैकी २६ जणांनी समुद्रात पोहत किनारा गाठला होता. तर ३ खलाशी बेपत्ता होते. बुधवारी रामचंद्र पाटील यांच्या नौकेवरील शिवचंद्र राजभर हा सालदुरे किनाऱ्यावर सुखरूप आढळून आला. तर फुलचंद राजभर या खलाशाचा लाडघर किनाऱ्यावर मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता दापोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. तर कैलास जुवाटकर हा खलाशी अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.