
मुंबई : तोट्यात चाललेल्या बेस्ट बससेवेला नवसंजीवनी मिळणे आवश्यक आहे. सातत्याने बेस्ट आर्थिक संकटात सापडत आहे. तेव्हा,” मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी ही सेवा वाचविण्यासाठी तीन हजार कोटींचे अनुदान द्यावे,” अशी मागणी कॉंंग्रेसने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
बेस्टला सुमारे २५०० कोटींचा संचित तोटा सहन करावा लागतो. मागील वर्षी ५९० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प बेस्टने सादर केला. विविध बँकांमध्ये पालिकेच्या ६१५१० कोटींच्या ठेवी आहेत. या रकमेचे दरवर्षी ४५०० कोटी इतके व्याज मिळते. यामुळे बेस्टने पालिकेकडे अनुदान देण्याची मागणी केली आहे. मात्र, एकही पैसा पालिकेने अनुदान म्हणून दिलेला नाही. त्यामुळे आता बेस्ट वाचवायची असेल तर पालिकेने तीन हजार कोटींचे अनुदान बेस्ट परिवहन विभागाला द्यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी बेस्ट समिती सदस्य अॅड संदेश कोंडविलकर यांनी तसे पत्र पालिका प्रशासनाला दिले आहे.















