डोंबिवली, (प्रशांत जोशी ) : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेली ती 27 गावे वगळून त्यांची नवी नगरपालिका करा अशी मागणी सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली. त्या गावातील ग्रामस्थांचीही अशीच मागणी पूर्वीपासून जोर धरत होती. त्या विषयी हरकतीही सरकार दरबारी जमा आहेत. या परिस्थितीमुळे सरकार हा प्रश्न मार्गी लावेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या 27 गावांच्या नव्या नगरपालिकेचे आश्वासन दिल्यामुळे सर्वांच्या नजरा त्या 27 गावांकडे वळल्या आहेत. आणि म्हणूनच आता त्या 27 गावांत गणिते जुळविण्यासाठी सर्व पक्षीय पुढारी सरसावले आहेत.
सत्ताधारी सेना-भाजपने भुमीपुत्रांचा विरोध डावलून पुन्हा ती 27 गावे पालिकेत समाविष्ट केली असा आरोप संघर्ष समिती करीत आली आहे. गावांच्या विकासासाठी 6500 कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या आधिवेशनात या गावांची नवीन नगरपालिका करण्याचे सुतोवाच केले. त्यामुळेच भविष्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसून आपआपली ताकद वाढविण्यास सुरुवात होत आहे.
पूर्वीपासून कल्याण शीळ रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा आता हाती घेऊन काही पुढाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोंडीला जबाबदार लोढा पलावा ही संकुले असून येथील मॉल बंद करण्याची मागणी होत आहे. वाहतुकीचे नियोजन न करता लोढाने रस्त्यालगत मॉल, गृहसंकुल उभारल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. जोपर्यंत वाहतुकीचा प्रश्न निकाली निघत नाही तो पर्यंत तो मॉल बंद ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुधीर पाटील केली आहे.
27 गावांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले. 27 गावे वगळण्यासाठी मनसेचे नगरसेवक राजिनामे देतील असे आश्वासन मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी संघर्ष मोर्चाला देऊन पक्ष बळकटीवर जोर दिला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून व अमृत योजनेतून 27 गावांसाठी रस्ते, पाणि व आरोग्य याचबारोबर स्मशानभूमी, समाजमंदिर, वीज पुरवठा व मेट्रो तसेच वाहतुक प्रश्न सोडविण्यासाठी एलिवेटेड रोड व उड्डाणपुल यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन नागरी सुविधा देण्यासाठी जोर लावला आहे.
27 गावे वगळून नवीन नगरपालिका करावी यासाठी काँग्रेसचे प्रदेश सदस्य संतोष केणे हे याच ग्रामीण भागातील काँग्रेस समर्थकांना बरोबर घेऊन नेत्यांकडे जोरदार मागणी करीत आहेत.
ग्रामिण भागात अनेक मातब्बरांनी भाजपात प्रवेश केल्याने व राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जोरदार प्रचार करुन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपही आपला पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागला आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कारभार विविध उदहरणांमुळे जनतेसमोर येत आहे. त्यामुळे जर पालिका बरखास्ती नंतर त्या 27 गावांची वेगळी नगरपालिका झाली तर आपलाच नगराध्यक्ष व्हावा व आपल्याच पक्षाची एकहाती सत्ता यावी यासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.