डोंबिवली, (प्रशांत जोशी) : येत्या अधिवेशन काळात संघर्ष समिती पदाधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणू. त्या २७ गावच्या वेगळ्या नगरपालिकेबाबत प्रक्रिया सुरू असून मुख्यमंत्रीही आशावादी आहेत असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिक्षेत्रातील त्या २७ गावातील सदनिका दस्तनोंदणी बंद असल्याविरोधात 27 गांव संघर्ष समितीने बुधवारी संघर्ष समिती माध्यमातून भव्य मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले त्यावेळी राज्यमंत्री चव्हाण बोलत होते.
गांधीनगर डोंबिवली पूर्व येथील उपनिबंधक कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, दत्ता वझे, डॉ.वंडार पाटील, अर्जुनबुवा चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष राजेश मोरे, गजानन मांगरुळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी गुलाब वझे म्हणाले, शासन दरबारी आणि कायद्यानुसार दस्तनोंदणी बंद बाबत ठोस भूमिका नसताना येथील भूमिपुत्रांवर अन्याय होत असून त्यांची उपासमार होत आहे. या निषेधार्थ आवाज ऊठवून न्याय हक्कासाठी या विरोधात निवेदन दिले असून आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. ते योग्य निर्णय देवून 27 गावांची नगरपालिका निश्चित करतील असा विश्वास येथील सर्वाना आहे.
एक वर्षांपासून 27 गावातील दस्तनोंदणी अचानक बंद केल्याने सरकारचा मोठा महसूल बुडत आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा सदर नोंदणी सुरू करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीतर्फे गांधीनगर रजिस्ट्रेशन कार्यालयावर मोर्चा काढला.