
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून तब्बल 2225 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून 1500 गाड्यांचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती रत्नागिरीचे एस.टी.विभाग नियंत्रक अनिल मेहत्तर यांनी दिली.
गणेशोत्सव काळात रेल्वे, बसेस फुल्ल असतात. अनेकांचं आरक्षण होत नाही. कितीही अडचणी आल्या तरी या सणाला चाकरमानी येतोच. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने जय्यत तयारी सुरु केली आहे. दररोजच्या फेऱ्यांव्यतिरिक्त ज्यादा बसेस मुंबई, पुणे, बोरिवली याठिकाणी सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान 2225 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून 1414 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये वाढ करण्यात आली असून 1500 गाड्यांचं परतीच्या प्रवासासाठी नियोजन करण्यात आलं आहे. याशिवाय रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे स्टेशन ते त्यांचं गाव अशा गाडया सोडण्यात येणार आहेत.