नवी दिल्ली : संपूर्ण देशामध्ये आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ करण्यात येईल. सध्याची स्थिती पाहाता देशात हा लॉकडाऊन 21 दिवसांचा असेल, तीन आठवड्यांचा असेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ केला आहे.
पंतप्रधान म्हणाले की, देशाला वाचवण्यासाठी, देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी, तुमच्या परिवाराला वाचवण्यासाठी, आज रात्री 12.00 वाजल्यापासून घरातून बाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. देशातल्या प्रत्येक राज्यांना, सर्व केंद्रशासित प्रदेशांना, प्रत्येक जिल्ह्यांना, प्रत्येक गाव, नगर, शहर, खेडी, वाडे-वस्ती, गल्ली-बोळ, अशा सर्वांना ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे. ही एकप्रकारे संचारबंदीच आहे. जनता कर्फ्यूपेक्षाही काही पावले पुढे जाणारी ही संचारबंदी आहे. जनता कर्फ्यूपेक्षाही जरा जास्त कडक, कठोर असणार आहे. कोरोना महामारीच्या विरोधात आता निर्णायक लढा देण्यासाठी ही पावले उचलणे अतिशय गरजेचं आहे. निश्चित स्वरुपात या लॉकडाऊनची एक आर्थिक किंमत देशाला मोजावी लागणार आहे. मात्र, एकेक भारतीयाचा जीव वाचवायचा आहे, तुमचा जीव वाचवायचा आहे, तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवायचा आहे, हीच यावेळी माझी, भारत सरकारची, देशाच्या राज्य सरकारची, प्रत्येक स्थानिक शासन संस्थेची सर्वात मोठी प्राधान्यक्रमाची बाब आहे. माझी तुम्हाला विनंती आहे आणि मी हात जोडून तुम्हाला विनंती करत आहे की यावेळी तुम्ही देशात कुठेही असाल तिथेच राहा. सध्याची स्थिती पाहाता देशात हा लॉकडाऊन 21 दिवसांचा असेल, तीन आठवड्यांचा असेल. यापूर्वी मी जेव्हा तुमच्याशी बोललो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी तुमच्याकडून काही आठवडे मागण्यासाठी आलो आहे. आगामी 21 दिवस प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आरोग्य विशेषज्ञांचा सल्ला लक्षात घेतला तर कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कमीत कमी 21 दिवसांचा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. जर या एकवीस दिवसात आपण काळजी घेतली नाही तर देश आणि तुमचे कुटुंब 21 वर्षे मागे जाईल. जर या एकवीस दिवसात आपण काळजी घेतली नाही तर अनेक कुटुंबे कायमची उद्ध्वस्त होतील आणि मी ही गोष्ट एक पंतप्रधान या नात्याने नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून सांगत आहे. म्हणून बाहेर पडणे काय असते हे आगामी 21 दिवसांसाठी विसरुन जा. घरातच राहा…. घरातच राहा आणि एकच काम करा ते म्हणजे आपल्या घरातच राहा. मित्रांनो, आजच्या निर्णयामुळे देशव्यापी लॉकडाऊनमुळे तुमच्या घराच्या बाहेर एक लक्ष्मणरेषा आखली गेली आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की घराच्या बाहेर पडणारे तुमचे एक पाऊल, तुमचे केवळ एक पाऊल कोरोनासारख्या गंभीर महाआजाराला तुमच्या घरात प्रवेश देईल. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेकदा कोरोनाने बाधित झालेली व्यक्ती सुरुवातीला अगदी सामान्य आणि निरोगी दिसते. ती व्यक्ती बाधित आहे हे कळतसुद्धा नाही. म्हणूनच काळजी घ्या, आपल्या घरातच राहा. तसं पाहायला गेलं तर जे लोक घरात आहेत ते लोक समाज माध्यमांवर नवनव्या पद्धतीने, नावीन्यपूर्ण प्रकाराने ही गोष्ट लोकांना सांगत आहेत. एक बॅनर मला सुद्धा आवडला. अतिशय कमी शब्दात एक महत्त्वाचा संदेश देणारा हा बॅनर मला तुम्हाला दाखवायचा आहे. को- रो- ना म्हणजे कोई – रोडपर – ना निकले, को रो ना म्हणजे कोई रोड पर ना निकले. विशेषज्ञांचे असे देखील सांगणे आहे की आज जर एखादी व्यक्ती कोरोनामुळे बाधित झाली असेल तर तिच्या शरीरात याची लक्षणे दिसेपर्यंत अनेक दिवस निघून जातात. या काळात ती व्यक्ती जाणते अजाणतेपणे तिच्या संपर्कात येणाऱ्या अनेक लोकांना संक्रमित करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार या आजाराने बाधित असलेली एक व्यक्ती, नीट ऐका केवळ एक व्यक्ती आठवडाभरात- दहा दिवसात शेकडो लोकांपर्यत हा आजार पसरवते. म्हणजेच हा रोग एखाद्या वणव्याप्रमाणे पसरत जातो. जागतिक आरोग्य संघटनेची आणखी एक आकडेवारी आहे. अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो जगभरात कोरोना विषाणूची सर्वप्रथम एक लाख लोकांना लागण व्हायला 67 दिवस लागले. म्हणजेच एक लाख लोकांपर्यंत पोहोचायला 67 दिवस, त्यानंतर केवळ 11 दिवस, केवळ 11 दिवसात आणखी एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली म्हणजे दोन लाख लोकांना. जरा विचार करा पहिल्या एक लाख लोकांना लागण व्हायला 67 दिवस आणि त्यानंतर ही संख्या दोन लाख व्हायला केवळ 11 दिवस. त्यानंतर ही बाब आणखी भयावह आहे की दोन लाख लोकांपासून तीन लाख लोकांपर्यंत या रोगाचा फैलाव व्हायला केवळ चार दिवस लागले. तुम्ही कल्पना करू शकता की कोरोना विषाणूचा फैलाव किती झपाट्याने होऊ शकतो आणि जेव्हा याचा फैलाव होऊ लागतो तेव्हा त्याला आवर घालणं अतिशय अवघड होतं. मित्रांनो, याच कारणामुळे चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इराण सारख्या अनेक देशामध्ये ज्यावेळी कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि हे देखील लक्षात ठेवा इटली असो किंवा अमेरिका, त्यांची आरोग्य सेवा, त्यांची रुग्णालये, त्यांची अत्याधुनिक संसाधने, संपूर्ण जगभरात सर्वोत्तम आहेत. त्यांची व्यवस्था सर्वोत्तम मानली जाते. असे असूनही या देशांना कोरोनाचा प्रभाव कमी करता आला नाही. या परिस्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की या परिस्थितीमध्ये आशेचा किरण कुठे आहे? उपाय काय आहे? कोणता पर्याय आहे? कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आशेचा किरण हा आहे की ज्या देशांनी या संकटाला तोंड दिले आहे त्यांच्याकडून मिळालेला अनुभव. म्हणजे ज्या देशांनी या संक्रमणावर नियंत्रण मिळवले. अनेक आठवडे या देशातील नागरिक घराबाहेर पडले नाहीत. या देशातल्या नागरिकांनी शत प्रतिशत, शंभर टक्के सरकारी निर्देशांचे पालन केले आणि म्हणून हे काही देश या महामारीच्या विळख्यातून बाहेर पडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आपल्याला देखील हे धरून चालले पाहिजे की आपल्यासमोर केवळ आणि केवळ हाच एकमेव मार्ग आहे. एषाः पंथाः आपल्याला घरातून बाहेर पडायचे नाही, मग काही झाले तरी चालेल, घरातच राहायचे आहे, सोशल डिस्टन्सिंग. पंतप्रधानांपासून गावातील सर्वसामान्य नागरिकापर्यंत सर्वांचा कोरोना पासून तेव्हाच बचाव होऊ शकतो, जेव्हा घराच्या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन होणार नाही. आपल्याला या महामारीचा फैलाव थांबवायचा आहे. या विषाणू संक्रमणाची साखळी तोडायची आहे. मित्रांनो, भारत आज त्या टप्प्यावर आहे जिथे आपली सध्याची कृती हे निश्चित करणार आहे की या महाभयंकर आपत्तीच्या प्रभावाला आपण किती कमी करू शकतो. ही वेळ आपला संकल्प वारंवार मजबूत करण्याची आहे, ही वेळ पावलो पावली संयम पाळण्याची आहे, जान है तो जहान है हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. मित्रांनो ही धैर्य आणि शिस्त दाखवण्याची वेळ आहे. जोपर्यंत देशात लॉकडाऊनची स्थिती आहे आपल्याला आपला संकल्प पाळायचा आहे. आपले वचन पाळायचे आहे.
21 दिवसांचा लॉक डाऊन दीर्घ काळ आहे, मात्र आपले आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे गरजेचे आहे, आपल्याकडे हाच एकमेव मार्ग आहे. प्रत्येक भारतीय व्यक्ती या संकटाचा समर्थपणे मुकाबला करेल आणि या कठीण काळावर विजय मिळवेल, असा विश्वास मला वाटतो. आपण आपली काळजी घ्या, आपल्या माणसांची काळजी घ्या. आत्मविश्वासासह, सर्व नियमांचे पालन करीत, संपूर्ण संयम बाळगत, विजयाचा संकल्प करीत आपण सर्वजण या बंधनांचा स्वीकार करू या, असेही पंतप्रधान म्हणाले.