मुंबई, विशेष प्रतिनिधी :- बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी -२०२१ ही माहितीने परिपूर्ण तसेच उपयुक्त आहे. सन २०२१ ची दिनदर्शिका देखील अतिशय आकर्षक असून त्याची संकल्पना लक्षवेधी आहे, असे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी काढले.
महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे २०२१ च्या मराठी नागरी दैनंदिनी तसेच दिनदर्शिकाचे प्रकाशन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, उप आयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महानगरपालिका मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुधीर तळेकर आदी अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱया सोयीसुविधांची तपशिलवार माहिती आणि महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकारी, विभाग यांचे संपर्काचे अद्ययावत तपशील नागरी दैनंदिनीच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहचत असतात. या नागरी दैनंदिनीला नागरिकांकडून दरवर्षी मोठी मागणी असते, हे या दैनंदिनीचे ठळक वैशिष्ट्य असल्याचे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
महापालिकेचे जनसंपर्क खाते सन १९५८ पासून नागरी दैनंदिनी प्रकाशित करीत असून यंदा नागरी दैनंदिनीचे ६३ वे वर्ष आहे. नागरी दैनंदिनी ६३ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित करीत असताना ती एक संग्राह्य आणि महत्वपूर्ण माहितीसह परिपूर्ण असेल, यावर भर दिला जातो. नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेचे मुद्रण भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयात करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, प्रकाशक तथा जनसंपर्क अधिकारी (प्र.) तानाजी कांबळे, उप जनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक, उप जनसंपर्क अधिकारी मिलिंद बाफना, छायाचित्रकार संजय जवळेकर व धिरज निपुर्ते, उपयोजित चित्रकार विष्णू शेलार यांच्यासह सुंदर छपाईबद्दल मुद्रणालयाचे व्यवस्थापक तळेकर व त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे महापौरांनी नमूद केले.