नवी दिल्ली : डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण, ट्रायने दिलेल्या माहितीनुसार २०१६ पर्यंत देशभरात सुमारे ३९१ दशलक्ष लोक इंटरनेटचा वापर करत होते. २०२० पर्यंत ही संख्या ७३० दशलक्षवर जाईल असा अंदाज नॅसकॉम या सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांच्या संघटनेने व्यक्त केला आहे. २०२० पर्यंत ६०० दशलक्ष ब्रॉडबॅण्ड जोडण्या दिल्या जातील असेही नॅसकॉमने म्हटले आहे.
विविध दूरसंचार कंपन्यांना सेवा पुरविण्यासाठी सरकारने ऑक्टोबर २०१६ मध्ये ९६५ मेगाहर्टस् स्पेक्ट्रम वितरित केले आहे. यामुळे जलद गतीच्या इंटरनेट सेवेसाठी आवश्यक ३ जी आणि ४ जी सेवा ग्राहक पुरविणे शक्य होणार आहे.
त्याशिवाय ग्रामीण भागात ब्रॉडबॅण्ड जाळे विस्तारण्यासाठी सरकारने भारतनेट हा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गंत ग्रामपंचायतींना फायबर नेटने जोडले जात आहे.