लांजा तालुक्यात शिवसेनेला गळती सुरूच; लांजा नगरपंचायत मधील कोत्रेवाडी वार्डमधील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेशरत्नागिरी, प्रतिनिधी : राजापूर, लांजा तालुक्यात शिवसेनेला गळती सुरूच आहे. डम्पिंग ग्राऊंडला स्थानिकांचा विरोध असतानाही शिवसेना सत्तेच्या जोरावर प्रकल्प रेटत असल्याने लांजा नगरपंचायत क्षेत्रातील कोत्रेवाडी वार्डमधील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाला विरोध करत येथील ग्रामस्थांनी भाजपचे नेते आणि प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. लांजा येथील आग्रे हाॅल या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला
हा प्रकल्प १०० टक्के हद्दपार करणार – निलेश राणे
शिवसेना सत्तेच्या जोरावर कोत्रेवाडी याठिकाणी डंपिंग ग्राउंड प्रकल्प राबवत आहे. मात्र हा प्रकल्प तुम्हाला नको आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत आहे. जोपर्यंत हा प्रकल्प १०० टक्के हद्दपार होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिली. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेत केवळ लोकप्रतिनिधीच नाहीत तर आणखी काही जण गुंतले आहेत. या सर्वांचा आपण भांडाफोड करणार असा गर्भीत इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी याप्रसंगी विरोधकांना दिला.
यावेळी व्यासपीठावर निलेश राणे यांच्यासह रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, भाजपा लांजा शहर अध्यक्ष प्रमोद कुरूप, जिल्हा चिटणीस हेमंत शेट्ये, तसेच माजी तालुकाध्यक्ष विजय कुरूप तसेच भाई जाधव नगरपंचायत मधील भाजपाचे गटनेते संजय यादव नगरसेविका शीतल सावंत मंगेश लांजेकर हे मान्यवर उपस्थित होते.














