रत्नागिरी, (आरकेजी) : 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील अनुराग रणगाडा प्रदर्शनासाठी डेरवण येथील क्रीडांगणावर ठेवण्यात आला आहे. रणगाडा येथे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यात आला आहे. पंजाबमधून डेरवणमध्ये चार दिवसांपूर्वी तो दाखल झाला असून सोमवारी हा रणगाडा व्ही. जे. सीटी स्पोर्टस् ऍकॅडमीच्या क्रीडांगणावर दिमाखात बसवण्यात आला. भारत-पाकिस्तान युद्धात वापरलेला हा रणगाडा डेरवणात दाखल झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच खेळाडूंसह नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पंजाब सीमेवर या रशियन बनावटीच्या यू- 55 अनुराग रणगाडय़ाचा वापर करण्यात आला होता. हा रणगाडा पंजाबमध्ये शासनाच्या अखत्यारित ठेवण्यात आला होता. रणगाडा डेरवणमध्ये भारतीय सैन्य दलातर्फे पाठवण्यात आला आहे. क्रीडांगणावर येणा-या विविध स्पर्धांतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने डेरवण येथील क्रीडांगणाच्या उजव्या बाजूस ठेवण्यात आला आहे.