रत्नागिरी, (आरकेजी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राजापुरातील जवाहर चौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी शहरातील विकासकामांचेही उद्घाटन आणि भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
रत्नागिरी शहराच्या प्रस्तावित ६४ कोटींच्या महत्वाकांक्षी पाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर शहरातील माळनाका येथील स्कायवॉकचेही उद्घाटन केले जाणार आहे. त्यादृष्टीने स्कायवॉकचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरीत सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच दौर्यात या संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या या रत्नागिरी दौऱ्यासाठी तालुका तसेच जिल्हा पातळीवर जोरदार नियोजन सुरू आहे. त्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे.