रत्नागिरी दि. 07 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी मार्फत रत्नागिरी, मिरजोळे, झाडगांव औद्योगिक क्षेत्र तसेच रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या गामपंचायती, मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली,टिके व इतर काही खाजगी ग्राहकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्य:स्थितीमध्ये काजळी नदीतील पाणी साठा अतिशय कमी झाल्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणी पुरवठा करणे अशक्य होत आहे. सध्या पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचे कोटेकोरपणे नियोजन करुन पाऊस चालू होईपर्यंत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने सध्या महामंडळाने पाणी पुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले आहे.
सध्याचा अल्प पाणीसाठी लक्षात घेवून व पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता ओळखून महामंडळाकडून 15मे 2021 पासून 25 टक्के पाणीपुरवठा कपात करण्याचे ठरविले आहे. तसेच सद्याची परिस्थिती लक्षात घेवून आपण पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी कपात करावी लागणार आहे. तरी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आपण महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग, रत्नागिरी यांनी केले आहे.