राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार गरोदर महिलांचा कोविड लसीकरणात समावेश
बृहन्मुंबई मनपा क्षेत्रात विविध ३५ ठिकाणी करण्यात येणार लसीकरण
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड – १९’ या आजारास प्रतिबंध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कोविड या आजारास प्रतिबंध करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर सुरक्षित अंतर ठेवणे, मुखपट्टी (मास्क) योग्यप्रकारे वापरणे, निर्जंतुकीकरण द्राव्याचा (सॅनिटायझर) उपयोग करणे, वारंवार हात धुणे या बाबी महत्वाच्या असून या अनुषंगाने सातत्यपूर्ण जनजागृती महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या आदेशान्वये दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची कार्यवाही ही टप्प्या-टप्प्याने व नियमितपणे करण्यात येत असून दिनांक १९ मे २०२१ पासून स्तनदा मातांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तर आता ‘राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट’ व ‘कोविड – १९’ लसीकरणासाठी असलेला ‘राष्ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्या शिफारशीनुसार भारत सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड – १९’ लसीकरणात समाविष्ट केले आहे. यानुसार गुरुवार दिनांक १५ जुलै २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
वरील अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘कोविड – १९’ या आजाराचा तीव्र संसर्ग (severe infection) होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच ‘कोविड – १९’ बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति (pre-term delivery) होण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘कोविड – १९’ बाधित ९०% गरोदर महिलांना दवाखान्यात भरती होण्याची गरज भासत नाही. परंतु सुमारे १०% गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे ‘कोविड – १९’ आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते व अचानक तब्येत ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते. तथापि, ‘कोविड – १९’ बाधित ९५% मातांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित ५% नवजात बालके प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकापूर्वी जन्माला येऊ शकतात. अशा बालकांच्या बाबत त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासू शकते किंवा क्वचित प्रसंगी नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू ओढवू शकतो. या बाबींपासून गर्भवती महिलांचा आणि होणा-या बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे फायदेशीर ठरु शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने गर्भवती महिलांचे ‘कोविड – १९’ लसीकरण करण्यासंदर्भात खालील निर्देश दिलेले आहेतः-
१. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधीत लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात.
२. प्रत्येक गरोदर महिलेने या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी व पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने (informed choice) लसीकरण करवून घ्यावे.
३. ज्या महिलांना ‘कोविड – १९’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ किंवा ‘convalescent’ प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना १२ आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल.
‘कोविड – १९’ लसीकरणानंतर, काही लाभार्थ्यांमध्ये सौम्य स्वरुपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा १ ते ३ दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते. तुरळक स्वरूपात १ ते ५ लाख लोकांमधील एखादया लाभार्थ्यास लसीकरणानंतर २० दिवसापर्यंत गंभीर लक्षणे आढळून येऊ शकतात.
या अनुषंगाने, गरोदर महिलांना कोविड लसीकरण व याबाबतचे समुपदेशन करण्याबाबत सर्व संबंधीत कर्मचा-यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले असून, गुरुवार दिनांक १५ जुलै २०२१ पासून गर्भवती महिलांसाठी ‘कोविड – १९’ लसीकरण सुरु करण्यात येत आहे. सदर लसीकरण पहिल्या टप्प्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे व काही शासकीय रुग्णालयांमध्ये देखील सदर लसीकरण करण्यात येणार आहे. या रुग्णालयांची यादी खालीलप्रमाणे-
| अ.क्र. | विभाग | रुग्णालायचे नाव | अ.क्र. | विभाग | रुग्णालायचे नाव |
| १. | ए | कामा रुग्णालय, फोर्ट | १९. | एम पूर्व | देवनार प्रसूतिगृह |
| २. | ई | बा.य.ल. नायर धर्मार्थ रूग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेन्ट्रल | २०. | एम पूर्व | पं. मदनमोहन मालविय शताब्दी रूग्णालय, गोवंडी (पूर्व) |
| ३. | ई | जगजीवनराम पश्चिम रेल्वे रूग्णालय, भायखळा | २१. | एम पूर्व | बी. ए. आर. सी. रुग्णालय, चेंबूर |
| ४. | ई | जे. जे. रूग्णालय, भायखळा | २२. | एम पूर्व | आर. सी. एफ. हॉस्पिटल |
| ५. | ई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रूग्णालय, भायखळा | २३. | एन | मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह |
| ६. | एफ उत्तर | मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा | २४. | एन | संत मुक्ताबाई मनपा सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर (पश्चिम) |
| ७. | एफ उत्तर | लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव | २५. | एन | सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी घाटकोपर (पूर्व) |
| ८. | एफ दक्षिण | राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, परळ | २६. | पी उत्तर | चौक्सी प्रसूतिगृह, मालाड |
| ९. | एफ दक्षिण
|
एम. जी. एम. रुग्णालय, परळ | २७. | पी उत्तर | मनोहर वामन देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, मालाड (पूर्व) |
| १०. | एफ
दक्षिण |
नायगाव प्रसूतिगृह | २८. | पी उत्तर | रिद्धी गार्डन मनपा दवाखाना |
| ११. | जी उत्तर | माहीम सूतिकागृह, माहिम | २९. | आर मध्य | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वसाधारण रूग्णालय, बोरीवली |
| १२. | जी दक्षिण | ई. एस. आय. एस. रुग्णालय, वरळी | ३०. | आर मध्य | चारकोप विभाग 3 प्रसूतिगृह |
| १३. | एच पूर्व | विष्णूप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, सांताक्रूझ (पूर्व)
|
३१. | आर
दक्षिण |
आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली |
| १४. | एच पश्चिम | के. बी. भाभा रूग्णालय, वांद्रे (पश्चिम) | ३२. | आर
दक्षिण |
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रूग्णालय, कांदिवली (पश्चिम) |
| १५. | के पश्चिम | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रूग्णालय, जुहू – विलेपार्ले (पश्चिम) | ३३. | आर
दक्षिण |
इ. एस. आय. एस. रूग्णालय, कांदिवली |
| १६ | के पूर्व | शिरोडकर प्रसूतिगृह, विलेपार्ले | ३४. | एस | एल. बी. एस. प्रसूतिगृह |
| १७. | एल | खान बहादूर भाभा मनपा रुग्णालय, कुर्ला भाभा, कुर्ला (पश्चिम) | ३५. | टी | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रूग्णालय,
मुलुंड (पूर्व) |
| १८. | एल | माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी |
त्याचप्रमाणे लसीकरणासंदर्भातील अधिक माहिती करीता सर्व आरोग्य केंद्र, प्रसतिगृहे, वैद्यकिय आरोग्य अधिकरी -विभाग यांच्याशी संपर्क साधावा.















