
औरंगाबाद, 8 मे : गावाकडे जाण्यासाठी पायी चालत निघालेले 16 स्थलांतरीत मजूर थकून रेल्वे रुळावर झोपले असताना वेगाने आलेल्या मालगाडीखाली चिरडले गेले, औरंगाबाद जिल्ह्यात ही घटना आज पहाटे पाचच्या दरम्यान घडली. अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
हे मजूर रेल्वे रुळावरून पायी भुसावळला जालना येथून जात होते. त्यांच्या मध्यप्रदेश येथील गावी ते परतीसाठी निघाले होते. चालून चालून थकवा आल्याने ते रेल्वे रुळावर झोपले. जालना येथून निघालेली मालवाहू ट्रेन याच सुमारास येथून गेली. करमाड जवळ हा अपघात घडला.
हे मजूर जालना येथील एका स्टील कंपनीत कामाला होते. काल रात्री ते त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे मार्गाहून पायी निघाले होते. ते करमाडपर्यंत आले. यानंतर थकवा आल्यानंतर रेल्वे रुळावर झोपले. यानंतर भरधाव आलेल्या मालगाडीखाली ते चिरडले गेले.
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद येथील रेल्वे दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणतात, “महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जीवितहानीमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जात आहे.“
















