मुंबई : हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरु झालेली वृक्ष लागवडीची चळवळ लोकचळवळीत रुपांतरित झाली असून या महत्वाकांक्षी उपक्रमात यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आज २५ तारखेपर्यंत राज्यात ११ कोटी ८८ लाख २९ हजार ०७८ झाडे लागली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार म्हणाले, आतापर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीमध्ये २८ लाख ५८ हजार २७६ वृक्षस्नेहींनी सहभाग नोंदवला तर १ लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर ही वृक्ष लागवड झाली आहे. वृक्षलागवडीमध्ये वन विभागाने ६ कोटी ८७ लाख ३८ हजार ८८३, वनेत्तर क्षेत्रात ४ कोटी १४ लाख ४७ हजार १९३, माय प्लांट ॲप द्वारे २ लाख ३९ हजार ६१०, रोपे आपल्या दारी कार्यक्रमातून २ लाख ४९ हजार ३७६, हॅलो फॉरेस्ट १९२६ द्वारे ९७७० वृक्ष लागवडीची ऑनलाईन पद्धतीने नोंद झाली आहे तर ऑफलाईन पद्धतीने ८१ लाख ४४ हजार २४६ रोपे लागल्याची माहिती वन विभागाकडे देण्यात आली आहे.
राज्यात सर्वाधिक वृक्ष लागवड नांदेड जिल्ह्यात झाली आहे ती ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे ६७ लाख १७ हजार १६३ रोपे लागली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे तिथे ६२ लाख ७१ हजार ७३८ वृक्ष लागवड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ५९ लाख ५२ हजार ५५८, गडचिरोली जिल्ह्यात ५१ लाख ९० हजार ७१७ वृक्ष लागवड झाली आहे. उस्मानाबाद, अहमदनगर, नंदूरबार,औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ४० लाखांहून अधिक वृक्ष लागवड झाली आहे.
राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीपैकी १२ कोटीच्या आसपास वृक्ष लागवड झाली असून हा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेला वेगाने जात आहे. ३१ जुलै २०१८पर्यंत राज्यात संकल्पापेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.