मुंबई : ११ वी ऑनलाईनची प्रवेश प्रक्रीया गुरुवारपासून सुरळीत होईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दहावीच्या निकालानंतर ११ वी साठीचे ऑनलाईन प्रवेश मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आदी विभागात सुरु झाले आहे. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया पार्ट-१ आणि पार्ट-२ स्वरुपात सुरु झाली आहे. पार्ट-१ मध्ये १० वी उत्तीर्ण झालेल्या एकुण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे शिल्लक राहीले आहेत. तर पार्ट-२ मध्ये ६७ हजार २८९ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. मुंबईत काही ठिकाणी सर्व्हर स्लो होण, हँग होणे अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या संदर्भात तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली.
तक्रारींबाबत आपण संबंधितांची एक बैठक घेतली. त्यादृष्टीने सर्व्हर आणि बँडविथ वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तरीही या प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निवड करताना तांत्रिक कारणामुळे कोणताही गोंधळ होऊ नये आणि प्रवेश प्रक्रीयेमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यादृष्टीने पूर्ण ऑनलाईन प्रक्रीया उद्या एक दिवस अपडेट करण्यात येईल, असे तावडे म्हणाले.
सर्व्हर आणि बँडविथची क्षमता वाढविण्यात येईल. उद्या संध्याकाळी या वेबसाइट मधील सर्व तांत्रिक बाजू आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांना घेऊन तपासणी करु आणि २२ जून रोजी सकाळी १० वाजता पुन्हा प्रवेश प्रक्रीया पुर्ववत सुरु होईल. एक दिवस वेळ झाला तरी पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ न होता प्रवेश प्रक्रीया बिनचूक होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कोणताही अन्याय होणार नाही, असे तावडे यांनी स्प्ष्ट केले. मुंबई वगळता अन्य विभागांमध्ये उद्या ही प्रक्रीया सुरु राहणार आहे. आतापर्यंत ज्या ६७ हजार २८९ विद्यार्थ्यांनी फॉर्म-२ भरण्याची प्रक्रीया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा फार्म भरण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.