![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2017/02/2611sfilogo_400x400-300x300.jpg)
२ जून रोजी सामाजिक न्याय मंत्री यांना मेसेज करणार आणि ट्विटरवर सुद्धा एक मोहिम चालवली जाणार !
मुंबई : विद्यार्थ्यांची हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा, अशी मागणी लॉकडाऊन काळात सातत्याने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने सरकारकडे करूनही दुर्लक्ष केल्याबद्दल उद्या 1 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे.
राज्यातील सर्व सर्व समाज घटकातील, सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. अशी एसएफआयची मागणी आहे. सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून एसएफआयने १ जून रोजी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्याची हाक सर्व विद्यार्थ्यांना आणि संघटनेच्या जिल्हा समित्यांना दिली आहे. हे आंदोलन लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, घराच्या परिसरात, गल्लीमध्ये करावे. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उतरावे, असे आवाहन एसएफआयने केले आहे.
एसएफआय राज्य कमिटीने १८ एप्रिल आणि २५ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले होते. परंतु अजूनही शिष्यवृत्ती जमा झालेली नाही. मागील शैक्षणिक वर्ष २०१९-२० संपले असूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण न होणे, हे सामाजिक न्याय विभागाच्या ढिसाळ नियोजनाचे लक्षण आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणजे दिलासा देणारी बाब आहे. म्हणून किमान या संकटाच्या काळात तरी सरकारने शिष्यवृत्तीचे वेळेत वाटप करणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले नाही. म्हणून एसएफआयच्या वतीने सोमवारी १ जून रोजी राज्यभरात आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे.
हे आंदोलन दोन टप्प्यात होईल. (१) दिनांक १ जुन रोजी एसएफआयच्या राज्यातील प्रत्येक जिल्हा समित्यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत शारीरिक अंतर ठेऊन आंदोलन करतील. हे आंदोलन विद्यार्थी व कार्यकर्ते आपल्या घरी, घराच्या परिसरात, गल्लीत राहून करतील. (२) दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेज करतील. आणि त्यातून शिष्यवृत्ती वाटप करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे.
यामध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी आणि एसएफआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. असे आवाहन एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी केले आहे.