शिवसेनेची पहिली यादी २३ जानेवारीला ; खासदार विनायक राऊत यांची माहिती
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. “आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली तर भाजपाही जिल्ह्यात स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरेल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले.
रत्नागिरी नगरपरिषदेची पोट निवडणूक होती. त्यावेळी भाजपासमोर आम्ही युतीसाठी प्रस्ताव ठेवला होता. भाजपाने आमचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. परिणामी भाजपाचा पराभव झाला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढलो. जिल्ह्यात आमचे वर्चस्व आहे. इतर पक्षांना उमेदवार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे, तर आमच्याकडे एका जागेसाठी पाच पाच उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना स्वबळावर लढेल, असे राऊत म्हणाले. जिल्हा परिषदेत आमचीच सत्ता येणार, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. २३ जानेवारीला शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.
भाजपाची ताकद जिल्ह्यात वाढत चालली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकाही आम्ही स्वबळावर लढलो, कार्यकर्त्यांचीही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची मागणी आहे, असे माने यांनी सांगितले.