रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार १३ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
सदर निकाल www.mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com, www.knowyourresult.com, www.rediff.com/exams, www.jagranjosh.com, www.sscresult.mkcl.org, या संकेतस्थळांवर पाहता येईल. परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. बीएसएनएलच्या (57766) या क्रमांकावर MHSSC (बैठक क्रमांक) नमूद करुन तसेच आयडीया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा, डोकोमो, बीएसएनएलच्या 58888111 या क्रमांकावर MAH10 (बैठक क्रमांक) नमूद करुन एसएमएस पाठविल्यास एसएमएसद्वारे निकाल उपलब्ध होईल.
या वर्षीपासून ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येईल. याबाबत आवश्यक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह बुधवार १४ जून ते शुक्रवार २३ जून या कालावधीत विहीत शुल्क भरुन अर्ज करता येईल व छायाप्रतीसाठी बुधवार १४ जून ते सोमवार ३ जुलै पर्यंत विहीत शुल्क भरुन अर्ज करता येईल.
मार्च २०१७ परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कार्यालयीन कामकामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहीत नमुन्यात विहीत शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेतंर्गत पुन:श्च परीक्षेस प्रविष्ठ होण्याची संधी सन २००८ पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार मार्च २०१७ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (सर्व विषयासह प्रविष्ठ होवून उत्तीर्ण होणाऱ्या) विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०१७ व मार्च २०१८ अशा दोन संधी उपलब्ध राहतील.
जुलै-ऑगस्ट २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने १९ जून पासून आवेदनपत्रे भरावीत, असे सांगण्यात आले आहे.