थंडीचा कडाका वाढल्याने पोषक वातावरण
रत्नागिरी : कोकणात थंडीचा कडाका वाढल्याने हापूस आंब्याच्या पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मागील अनेक वर्षांपासून निसर्गचक्राच्या संकटात सापडलेल्या आंब्याचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये खुशीची लहर पसरली आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी आंब्याच्या हंगामाला सुरुवात होईल. यावर्षी अंदाजे ७० टक्के आंब्याचे उत्पादन होऊ शकते. त्यामुळे आंब्याचा दर सर्व सामान्यांना परवडणारा राहील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दुसर्या टप्प्यात चांगला मोहर आला आहे तसेच झाडांवर कैर्याही दिसू लागल्या आहेत. तेव्हा यावर्षी उत्पादन भरघोस होऊन खवय्यांना मोठ्या प्रमाणावर हापूस चाखायला मिळणार आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात आणला जाईल. तर दुसर्या टप्प्यातील पोषक वातावरणामुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर आंबा उपलब्ध असेल.
“थंडीमुळे आंब्याचे उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. खवय्यांसाठी ही पर्वणी असणार आहे. हवामानात झालेला बदल आंबा पिकाच्या पथ्यावर पडला आहे,” अशी माहिती बागायतदार प्रसन्न पेठे यांनी दिला.
“आंब्यासाठी पोषक वातावरण आहे. तरिही आंब्याचा काळजी घेणे आवश्यक आहे. मोहर आणि फुटलेल्या वाटाण्याएवढ्या कैरीला योग्य रितीने हाताळणे आवश्यक आहे. या वर्षी निसर्गाने कृपादृष्टी दाखवली आहे, त्यामुळेच उत्पादन विक्रमी होणार आहे.” – श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ