मुंबई : सुरक्षीत प्रवासाची हमी आम्ही देतो, असे म्हणणार्या बेस्टच्या बससेवेला आज कलंक लागावा अशी घटना घडली. मुलुंडकडून अंधेरीच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणार्या ३९६ क्रमांकाच्या बसने आज दुपारी अचानक पेट घेतला. बसमध्ये बिघाड झाला, असे चालकाच्या निदर्शनास आले आणि त्याने प्रवाशांना सतर्क करून खाली उतरवले. चालकाने प्रसंगवधान दाखवले नसते, तर खूप मोठी दुर्घटना घडली असती.
बेस्टची ३९६ क्रमांकाची बस दररोजच्या फेरीवर मुलुंडहून अंधेरी पूर्व येथे निघाली होती. ही बस चकाला येथे आली. त्याचवेळी बसच्या इंजिन मधून आवाज आला. काहीतरी तांत्रीक बिघाड असल्याचे चालकाच्या त्वरीत लक्षात आले. त्याने सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी उतरल्यानंतर अचानक स्फोट झाला आणि क्षणार्धात बसने पेट घेतला. ही आग पसरून शेजारी मारुती कारलाही आग लागली. अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझवली.