सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधाबरोबरच सर्वसामान्याचे दरडोई उत्पन्न वाढविणे आणि त्यातून विविध कल्याणकारी योजना राबवून विकास करणे हे माझे ध्येय आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
सावंतवाडी तालुक्यातील नाबार्ड योजनेतून वेत्ये -मळगाव-नेमळे रस्ता खडी व डांबरीकरण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते.पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, रुपेश राऊळ, वेत्येचे सरपंच गावडे, मळगांवचे सरपंच गणेश पेडणेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चिपटेवाडी रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे, नाबार्ड योजनेंतर्गंत मडुरा-सातोसे-सातार्डा-कवठणी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे, मडुरायेथे स्ट्रीट लाईट बसविणे, मडुरा-शेर्लेकरवाडी रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे आदी कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांनी केले.
आरोसचा विकास करणार
आरोस गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अडीच कोटीचा निधी दिला आहे. ग्रामसचिवालयासाठी 10 लाखाचा निधी दिला आहे. येथे सुसज्ज इमारत उभारुन या गावाचा कायापालट केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आरोस ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन केसरकर यांनी केले. पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, रुपेश राऊळ, आरोसच्या सरपंच साक्षी नाईक, दांडेली सरपंच चित्रा गोडकर, राजू नाईक, लाडोबा केरकर, गजानन परब, गुरुनाथ नाईक आदी यावेळी उपस्थित होते.