सिंधुदुर्ग : सागर किनाऱ्यांच्या विकासातूनच जिल्ह्याची आर्थिक प्रगती होईल. तेव्हा त्या दृष्टीने निर्मल सागर तट अभियानांतर्गत समाविष्ट सागर तटीय ग्रामपंचायतींनी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या निर्मल सागर तट अभियानाच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
नविन जिल्हा नियोजन समिती सभागृहात निर्मल सागर तट अभियानात समाविष्ट 22 ग्रामपंचायतींसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, स्वच्छ भारत अभियानचे अनिल बागवे, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबा थोरात, एशियन डेव्हल्पमेंट बॅंकेचे व्यवस्थापक हरिश्चंद्र रायसिंघानी तसेच प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपनो आदी यावेळी उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. यासाठीच या अभियानात समाविष्ट सागरतट ग्रामपंचायतींनी समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता येथील पर्यावरण हे राखलेच पाहिजे. त्याबरोबर यातून आपल्या गावात रोजगारच्या संधी कशा निर्माण होतील यासाठी नवनविन कल्पना राबवायला पाहिजेत, असे मार्गदर्शन केसरकर यांनी केले. पर्यटनाच्या माध्यमातून मच्छिमारी विकसीत करणे, निवास न्याहरी योजना राबविणे. हे अपेक्षित असतानाच केवळ एका पद्धतीने विचार न करता या सर्वांतून आर्थिक विकासासाठी नवनविन उपक्रम राबविले पाहिजेत. यासाठी गावाचे जे नेतृत्व करतात त्यांनी विकासाचा प्रयत्न केला पाहिजे, असेही ते म्हणाले.