देवास(मध्य प्रदेश) : रा. स्व. संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्या प्रकरणातून साध्वी प्रज्ञा सिंगसह आठ जणांची सबळ पुराव्याअभावी स्थानिक न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. २९ डिसेंबर २००७ रोजी जोशी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होतो.
प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव आपटे यांनी प्रज्ञा, हर्ष सोलंकी, वासुदेव परमार, रामचरण पटेल, आनंदराज कटारिया, लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी आणि जितेंद्र शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली. निकाल देताना न्या. आपटे म्हणाले की, या हत्येच्या गुन्ह्यात सहभाग आहे, असा कोणताही पुरेसा पुरावा आरोपींविरुद्ध सापडलेला नाही.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास बंद होण्याच्या मार्गावर होता. पण, नंतर राजस्थानमधून एका व्यक्तिच्या अटकेनंतर या प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि अन्य एका व्यक्तिचे नाव तपासात पुढे आले.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयातून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) भोपाळमधील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. एनआयए ही दहशतवादविरोधी तपास यंत्रणा आहे आणि हे प्रकरण हत्येशी संबंधीत होते. त्यामुळे ते एनआयएच्या कक्षेत येत नसल्याने पुन्हा सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयाकडे पाठविण्यात आले. जोशी हे प्रज्ञाचे विश्वासू सहकारी होते. त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने जोशी वेगळे झाले होते.
दहशतवादाच्या आरोपांतर्गत साध्वी ही न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे न्यायनिर्णय होत असताना ती न्यायालयात उपस्थित नव्हती.