
नागपूर : पत्नी, दोन मुले आणि मुलगी यांची क्रुरपणे हत्या करणार्या नराधमांना फाशी मिळावी, यासाठी न्यायाच्या प्रतिक्षेत असणार्या भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले. माणूसकीला काळीमा फासणार्या खैरलांजी हत्याकांडातील भैय्यालाल हे पीडित आणि एकमेव साक्षीदार होते. मृत्यूसमयी ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे एका संघर्षाची अखेर झाली, अशी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भोतमांगे हे भंडार्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वसतिगृहात शिपाई या पदावर कार्यरत होते. दुपारच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने डॊक्टरांकडे नेण्यात आले. यावेळी नागपूर येथे घेऊन जा, असा सल्ला डॊक्टरांकडून देण्यात आला. रुग्णवाहिकेने त्यांना काँग्रेसनगर येथे असणार्या श्रीकृष्ण रुग्णालयात दाखल केले गेले. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
सन २००६ मध्ये भंडारा जिल्ह्यात असणार्या खैरलांजी या गावात भोतमांगे कुटुंबाला अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आले होते. जातीय द्वेषातून हे प्रकरण घडले होते.