रत्नागिरीतील कासव संवर्धन केंद्रांचे यश; कासव तस्करीही रोखली
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : कासवांची तस्करी रोखली जावी, यासाठी जिल्ह्यात सुरू झालेल्या कासव संवर्धन केंद्रांनी मागील पाच वर्षांत सुमारे ५० हजार कासवांच्या पिल्लांना जीवदान दिले आहे. पर्यावरण रक्षणात महत्वाची कामगिरी बजावल्यामुळे या संवर्धन केंद्रांचे विशेष कौतुक जिल्ह्यात केले जात आहे.
कासव हा निसर्ग संवर्धनातील महत्वाचा घटक मानला जातो . कासवे आणि त्यांच्या अंड्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत होती. यावर उपाय म्हणून वन विभागाने कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धन केंद्र सुरू केली आणि या केंद्रांनी केलेल्या उपाययोजनांना यश मिळाले आहे.
कासव संवर्धन केंद्रांचे कार्य
कोकणच्या किनारपट्टीवर समुद्री कासवांची अंडी सापडतात. ही अंडी कासव संवर्धन केंद्रांतील घरट्यात सुरक्षित ठेवली जातात. घरट्यातून निघालेले पिल्लू समुद्रात सोडले जाते. अलिबागपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीवर कासव संवर्धन केंद्र सुरू झाली आहेत. या केंद्रांमुळे दरवर्षी हजारे कासवांच्या पिल्लांचे संवर्धन केले जात आहे.
रत्नागिरीतील संवर्धन केंद्रे
रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास , केळशी ,पडले, दाभोळ ,मुरुड , कर्दे , गुहागर , राजापूर येथील समुद्र किनार्यांवर कासव संवर्धन केंद्र आहेत.
नुकतेच केलेले कार्य
दापोलीतील कोलथरे कासव संवर्धन केंद्रातील घरट्यातील समुद्री कासवांची ८५ पिल्ले कोलथरे येथील समुद्रात मंगळवारी सोडण्यात आली.
निसर्ग संवर्धनात कासवांचा उपयोग
कासव हे निसर्ग संवर्धनात उत्तम कार्य बजावतात. पाण्यात राहून कासवे शेवाळ खातात, त्यामुळे पाणी साफ होऊन पाण्यातील प्राणवायू (oxygen) वाढण्यास मदत होते.
का होते तस्करी?
वास्तुशास्त्र आणि अंधश्रध्देतून कासवांची तस्करी होत आहे. अनेकजण कासव खाणे पसंत करतात, हे ही तस्करीचे प्रमुख कारण मानले जाते.