विक्रोळी : सामान्य माणसाला ही विमानप्रवास करता याव तसेच त्याला सहजरित्या पासपोर्ट मिळावा असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे, त्यासाठीच छोट्या छोट्या विभागात पासपोर्ट (पारपत्र) कार्यालय सुरू केले जात आहे, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांनी गुरुवारी(ता. 1) केले. कन्नमवार नगरमधील टपाल कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्राच्या उदघाटनावेळी ते बोलत होते.
” येत्या काळात देशातील अंतर्गत हवाई वाहतूक वाढणार आहे. त्यासाठी देशातील विमान कंपन्यांनी 900 नवी विमाने आगाऊ राखून ठेवली आहेत” अशी माहितीही त्यांनी दिली. खासदार किरीट सोमय्या, चीफ मास्टर जनरल हरिशचंद्र अग्रवाल, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी भाजप मुंबई उपाध्यक्ष माजी आमदार मंगेश सांगळे यावेळी उपस्थित होते. या केंद्रामुळे वरळी, अंधेरी, ठाणे या पासपोर्ट कार्यालयाचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे. आता पूर्व उपनगरातील नागरिकांचा वेळ या केंद्रामुळे वाचणार आहे. मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, पवई, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द, कुर्ला येथील नागरिकांना या केंद्राचा फायदा होणार आहे. अंदाजे 42 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे.
पासपोर्ट सेवेच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करून येणाऱ्या नागरिकांच्या अर्जाची छाननी, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम पोस्टात होणार आहे. यामुळे पूर्व उपनगरातील नागरिकांना त्यांचा जवळपासच अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. 4 दिवसात घरपोच पासपोर्ट मिळणार आहे. तात्काळ पासपोर्टची सुविधा या केंद्रावर उपलब्ध नसणार आहे.