
रत्नागिरी, 24 जून : कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या ताडाख्यातून बीएसएनएल अर्थात भारतीय संचार निगम लिमिटेड सुद्धा सुटलेली नाही. बीएसएनएलचं मोठं नुकसान यामध्ये झालं आहे. सध्या बीएसएनएलची दापोलीतील 16 तर मंडणगडमधील 8 सब स्टेशन बंद आहेत. त्यामुळे या भागातील बीएसएनएलचे जवळपास 23 हजार ग्राहक सध्या नाॅटरिचेबल आहेत.
चक्रीवादळामुळे दापोली, मंडणगड तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं. अनेकांची घरं पडली, नारळी-पोफळी, आंबा-काजूच्या बागा उद्धवस्त झाल्या. महावितरणचीही मोठी हानी झाली आहे. मात्र आपल्या पडत्या काळातही अनेक अडचणींचा सामना करत लोकांना आपल्या माध्यमातून जोडून ठेवणाऱ्या बीएसएनएललाही वादळाचा मोठा फटका बसला आहे. दापोली, मंडणगडमधील बीएसएनएलचे 40 मिटरचे दोन महत्वाचे टाॅवर्स बंद पडलेत. त्याशिवाय जवळपास 35 टाॅवर्स सध्या बंद आहेत. यातील काही टाॅवर्स जमिनदोस्त झाले आहेत. त्यामुळे बीएसएनएलचं लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. मुळात या सर्व टाॅवर्सना लागणारा विद्युत पुरवठा अद्याप सुरळीत सुरू झालेला नाही. त्यामुळे बीएसएनएल समोरच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. बीएसएनएलच्या सबस्टेशनची छपरे कोसळली आहेत. त्यात बीएसएनएलची सेवा पुर्ववत करण्यासाठी आवश्यक सामुग्रीचा पुरवठा झालेला नाही. त्यात संपूर्ण यंत्रणा नव्याने उभारावी लागणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे अजून काही दिवस तरी दापोली आणि मंडणगडमधील बीएसएनएलचे ग्राहक नाॅट रिचेबल राहण्याची शक्यता आहे.
मॅनपॉवरचा तुटवडा
बीएसएनएलमध्ये मध्यंतरी अनेकांनी व्हीआरएस घेतली. त्यामुळे सध्या बीएसएनएलमध्ये मॅनपॉवरचा तुटवडा आहे. आहे त्या मनुष्यबळात काम करून घेताना अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.