रत्नागिरी : लांजा नगरपंचायतीचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. कोणतीही करवाढ न करता १९ कोटींचा अर्थसंकल्प आणि २ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाला नागरपंचयातीच्या विशेष सभेमध्ये मंजूरी देण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात अग्निशमन व्यवस्थेसाठी पाणी पुरवठा तसेच स्वच्छता आणि विविध विकास कामावर भरीव तरतूद करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष संपदा वाघधरे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. या सभेत सुरुवातीलाच १० कोटी २६ लाख ९७ हजार जमा तर ८ कोटी ६५ लाख २९ हजार अपेक्षित खर्च असे सुमारे १९ कोटींचे अंदाजपत्रक सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आले.
नव्या आर्थिक वर्षासाठी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून लांजा हायस्कूलजवळ मल्टी पर्पज हॉल बांधण्यात येणार आहे. तेरावा वित्त आयोगातून शहरात पूरक पाणी जलवाहिनी ,७५ एच. पी.पंप, कुवे येथे ग्रॅव्हीटी जॅकवेलने येथे पाणी आणले जाणार आणि नागरी सुविधा केंद्र अशी कामे केली जाणार आहेत.
या सभेला नगराध्यक्ष संपदा वाघधरे, उपनगराध्यक्ष रवींद्र कांबळे, नगरसेवक दिलीप मुजावर, मनोहर कवचे, परवेश घारे, मानसी डाफळे, मदन राडये, तृप्ती वागधरे, मुरलीधर निवळे, सुगंधा कुंभार, तनिषा कांबळे, गटनेते सुनील कुरूप , प्रणिता बोडस, वैष्णवी कुरूप, पूर्वा मूळे, यामिनी जोईल, रुपेश गांगण, नागेश कुरूप, मुख्याधिकारी नयना ससाणे, लेखापाल शेट्ये, मुख्य लिपिक चंद्रकांत कुरूप, विजय गुंडये आणि अधिकारी उपस्थित होते.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यासाठी २५ लाख, पर्यटन महोत्सवासाठी २ लाख, स्वच्छतेसाठी १४ वित्त आयोगातून १कोटी ७०लाख, एलइडी दिवे खरीदीसाठी ३लाख, अग्निशमक वाहन खरेदीसाठी ३०लाख, ७५ एच. पी. पाणी पंपासाठी जॅकवेल वर २०० एच. पी.ट्रान्सफार्म बसविण्यासाठी ८ लाख, मासळी व मटण मार्केट दुरुस्तीसाठी ८ लाख, दलितवस्ती विकासासाठी १५ लाख, तेरावा वित्त आयोगातून २ कोटी२५ लाख, अल्पसंख्याकबहुल विकासासाठी ५१ लाख, नाविन्य पूर्ण योजनेसाठी ५१ लाख. तसेच महिला बालकल्याण, आरोग्य, अशा अनेक कामांवर भरीव तरतूद केली गेली आहे.