रोजगार निर्मितीच्या दृष्टीने शिवग्रामीण टॅक्सी महत्त्वाची योजना – उद्धव ठाकरे
मुंबई : ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी शिवग्रामीण टॅक्सी योजना आजपासून सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या योजनेचे उद्घाटन केले. वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथील कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात काही जणांना शिवग्रामीण टॅक्सीच्या चाव्यांचे वाटप केले गेले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम,महापौर स्नेहल आंबेकर, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब, तृप्ती सावंत, भरत गोगावले, परिवहन आयुक्त डॉ.प्रविण गेडाम यांच्यासह विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
काय आहे शिवग्रामीण टॅक्सी योजना ?
बाद झालेल्या ‘तीन चाकी – सहा आसनी’ ॲटो रिक्षांच्या परवानाधारकांना आता 700 सीसी इंजिन क्षमता असलेली ‘चार चाकी – सहा आसनी’ टॅक्सी वापरास परवानगी देण्यात आली. ही योजना आजपासून ‘शिवग्रामीण टॅक्सी योजना’ या नावाने सुरु करण्यात आली. शिवग्रामीण टॅक्सी योजनेत वाहनाची रंगसंगती ही नारिंगी – पांढरा अशी ठेवण्यात आली आहे
रोजगार निर्मिती वाढणार– उद्धव ठाकरे
ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या परिवहन विभागाने सुरु केलेली शिवग्रामीण टॅक्सी योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय परिवहन विभागामार्फत खास महिलांसाठी अबोली रंगाची रिक्षासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. या रिक्षाच्या चालक महिलाच असल्याने त्यात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी मिळेल. महिला रिक्षा चालकांना हक्काचा रोजगारही उपलब्ध होणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
सुरक्षित प्रवासाची हमी – दिवाकर रावते
ग्रामीण भागात तीन चाकी रिक्षा लोकप्रिय झाल्या होत्या. पण सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने तीन चाकी रिक्षांऐवजी चार चाकी टॅक्सीच्या वापरासाठी परवानगी देण्याबाबत विविध रिक्षा संघटना व रिक्षा चालकांमार्फत मागणी होत होती. त्याची दखल घेऊन शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता चार चाकी – चार आसनी तसेच चार चाकी – सहा आसनी अशा दोन स्वरुपाच्या शिव ग्रामीण टॅक्सींच्या वापराला परवानगी देण्यात येत आहे. या टॅक्सींमुळे लोकांचा प्रवास सुरक्षित होण्याबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.
महिलांकरिता रिक्षा परवान्यांमध्ये 5 टक्के आरक्षण
महिलांकरीता रिक्षा परवान्यांमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही परिवहन विभागाने घेतला असून या योजनेचा उद्या ठाणे येथे शुभारंभ करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी केली. अबोली रंगाच्या असलेल्या या रिक्षा महिलांची सुरक्षितता आणि त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून उद्या प्रातिनिधीक स्वरुपात 50 महिलांना त्या प्रदान करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.